अभिनयाचा कोणताही वारसा नसताना स्वमेहनतीने स्वतःचं वेगळं स्थान सिनेसृष्टीत निर्माण करणारे बरेच कलाकार आहेत.यामध्ये एका अभिनेत्रीचं नाव आवर्जून घेतलं जातं ते म्हणजे उर्मिला निंबाळकर. हिंदी व मराठी मालिकांमधून अभिनयाची छाप सोडत आजवर छोटा पडदा गाजवणाऱ्या या अभिनेत्रीने स्वतःच नाव स्वमेहनतीने कमावलं आहे. दुहेरी या मराठी मालिकेतून घराघरांत पोहोचलेली आणि दिया और बाती, मेरी आशिकी तुमसे या हिंदी मालिकेतून उर्मिलाने तिच्या अभिनयाची जादू दाखवली. (Urmila Nimbalkar Emotional Story)
‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीचा सिनेसृष्टीतील प्रवास काही सोपा नव्हता. सुरुवातीला ऑडिशनसाठीची धडपड, मुंबईसारख्या नव्या शहरात सुरु असलेली धावपळ आणि काम मिळाल्यानंतर कारण नसताना घेतलेला चोरीचा आळ. हो चोरीचा आळ. अभिनेत्री उर्मिला निंबाळकरवर चोरीचा आरोप लगावून तिला मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. एका हिंदी मालिकेच्या सेटवर एका प्रख्यात ब्रँडची लिपस्टिक चोरीला गेल्याचा आळ या मराठमोळ्या अभिनेत्रीवर करण्यात आला होता. याबाबतचा खुलासा खुद्द अभिनेत्रीनेच इंस्टग्राम पोस्ट आणि तिच्या स्वतःच्या युट्युब चॅनेलवरून केला.
पोस्ट शेअर करत याबाबत बोलत उर्मिला म्हणाली, “तर झालं असं, एका मोठ्या हिंदी मालिकेच्या सेटवर, त्या मालिकेतील हिरोईनची मेकअप आणि हेअर ड्रायरची बॅग चोरीला गेली. त्याचवेळेस पैसे साठवून मी मॅक या ब्रँडची एक लिपस्टिक विकत घेतली होती. तेवढी एकच लिपस्टिक अप्रतिम क्वालिटीची, ब्रॅंडेड आणि माझा ओठांना रॅश न येऊ देणारी असल्यामुळे मी प्रत्येक शुटिंगमधे ती वापरायचे. मराठी कलाकाराच्या पर डे पेक्षा मोठ्या किंमतीची लिपस्टिक माझ्या हातात दिसल्याने, माझ्यावर चोरीचा पहिला संशय घेण्यात आला. या प्रकरणात माझा काहीही संबंध नसल्याने, साहजिकच त्यांना मी माझी संपुर्ण बॅग चेक करु दिली.
यापुढे लिहीत उर्मिला म्हणाली, “माझा मोठा भाऊ भारतातील सर्वात तरुण आयपीएस अधिकारी म्हणून निवडला गेला असून, माझे वडिल व्याख्यान व प्रवचने करतात. माझ्या कुटुंबातील प्रत्तेक पुरुष पिढ्यांपिढ्या शेती करतोय. कलेचा कसलाही वारसा नसलेल्या कुटुंबातील मी पहिलीच मुलगी आहे, जी एकटी दोन बस आणि दोन लोकल बदलून, मुंबईत प्रामाणिकपणे ॲाडिशन पास करुन, सेटवरील एकमेव मराठी कलाकार असूनही वेगळ्या भाषेत काम करतेय. बेंबीच्या देठापासून ओरडून मला त्यांना सांगायचं होतं की मी चोर नाही. त्या माझ्या सर्वात आवडत्या एकमेव लिपस्टिकमुळे माझी डायरेक्ट लायकी काढण्यात आली होती. इतकं अपमानास्पद कधीच वाटलं नव्हतं मला.”
यानंतर आलेला एक अनुभव शेअर करत उर्मिला म्हणाली, मला मॅक कंपनीचा मेल आला, आम्हाला तुमच्या मराठी युट्यूब चॅनेलवर आमचं नविन प्रॅाडक्ट पहिल्यांदा लॉंच करायचं आहे आणि आम्ही तुमच्या प्रामाणिक प्रतिक्रेयेचे तुम्हाला पैसे देऊ! तुम्ही तुमच्या गोड मराठी भाषेतच बोला हा त्यांचा आग्रह होता. आपल्या आवडत्या ब्रॅंडबरोबर काम करुन पैसे मिळवण्याचा आनंद आहेच पण माझा हा प्रवास मलाच आनंदाचा अभिमानाचा वाटतो!” असं म्हणत तिने तिचा कटू अनुभव शेअर केला.