मराठीमधील स्टँडअप क्वीन व अनेक चित्रपटांमधून समोर आलेली अभिनेत्री तृप्ती खामकर ही सध्या खूप चर्चेत आहे. नुकतीच ती बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर, तब्बू व क्रिती सेननबरोबर ‘क्रू’ या चित्रपटामध्ये दिसून आली आहे. तिची भूमिका लहान असली तरीही प्रेक्षकांनी खूप पसंती दर्शवली आहे. या चित्रपटानेदखील बॉक्सऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. पण आता या चित्रपटातील भूमिकेबद्दल तृप्तीने नाराजी दर्शवली आहे. तिने चित्रपटाच्या निर्मात्यांवर आरोप केले असून अनेक समस्या आल्याचे तिने सांगितले आहे. याबद्दल तिने उघडपणे भाष्य करत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. (Trupti khamkar on crew movie)
तृप्तीने नुकताच ‘झुम’ या वाहिनीला मुलाखत दिली आहे. यामध्ये तिने ‘क्रू’च्या निर्मात्यांनी अन्याय केल्याचे सांगितले आहे. चित्रपटाच्या चित्रकरणादरम्यान कधीही मुख्य अभिनेत्रींबरोबर काम करण्याची संधी मिळाली नाही. तसेच तिला पूर्ण स्क्रिप्टदेखील दिली जात नसे असे सांगितले आहे.
ती याबद्दल म्हणाली की, “जेव्हा तुम्ही एखाद्या स्टारबरोबर काम करता तेव्हा साहजिकच आधी त्यांचे काम होते आणि ते घरी निघून जातात. त्यानंतरच तुमचे काम सुरु होते. अनेकदा तर १२ तासाच्या शिफ्टमध्ये सगळे कॅमेरे त्यांच्यावरच असतात. मी त्यावेळी तिथे उभी राहून माझे संवाद पाठ करत असत. तसेच जेव्हा त्या तिघी निघून जात तेव्हा माझ्याकडे फक्त अर्धा तास उरायचा. त्यानंतर १२ तासाचे काम माझ्याकडून शेवटच्या अर्ध्या तासात करुन घेतले जायचे. मी देखील यासाठी तयार व्हायचे आणि अर्ध्या तासात सर्व संवाद बोलायचे”.
तृप्तीला १२ तासांचे काम अर्ध्या तासात करावे लागल्याने खूप वाईट वाटायचे. तिला कोणतीही स्क्रिप्ट मिळायची नाही त्यामुळे संपूर्ण दिवस तिला सजग राहावे लागायचे. कोणता सीन चित्रित केला जात आहे याकडे लक्ष ठेवावे लागायचे. मुख्य अभिनेत्रींबरोबर असूनदेखील तिला एकत्रित काम करण्याची संधी मिळाली नाही.
‘क्रू’मध्ये काम केल्यानंतर आता ती कोणत्याही आव्हानांचा सामना करु शकते असेदेखील ती म्हणाली. याबद्दल तृप्तीने सांगितले की, “मला असं वाटत की मला यामुळे खूप काही शिकायला मिळालं. माझ्याकडे थिएटरची मास्टर डिग्री आहे पण त्याचा काही फायदा नाही झाला. सेटवर तुम्हाला जी ट्रेनिंग मिळते ती वेगळी असते.तुम्हाला दिवसभर सेटवर लक्ष ठेवावे लागते. तुम्हाला स्क्रिप्ट मिळत नाही. तुम्ही कोणत्या सीनमध्ये आहात त्यावर लक्ष ठेऊन समोरचा काय बोलणार आहे त्यावर तुम्हाला त्याप्रमाणे उत्तर द्यावे लागते. मला चित्रपटाने खूप काही शिकवलं असून आता मी कोणत्याही सेटवर समस्यांचा सामना करु शकते”.
तृप्तीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती या आधी ‘तुम्हारी सुलू’, ‘झोंबीवली’, ‘कौन प्रवीण तांबे?’, ‘गोविंदा मेरा नाम’ अशा अनेक चित्रपटामध्ये दिसून आली होती.