‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून अभिनेत्री अंकिता लोखंडे घराघरांत पोहोचली. या मालिकेमुळे अंकिताला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. मालिका संपून आज अनेक वर्ष झाली असली तरी या मालिकेला वा अंकिताच्या भूमिकेला प्रेक्षक अजूनही विसरलेले नाही आहेत. याशिवाय या मालिकेदरम्यान अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आली. या मालिकेतील तिचा सहकलाकार अभिनेता सुशांत सिंग राजपूतबरोबरच्या डेटिंगमुळे ती चर्चेत आली. पण नंतर दोघांमध्ये मतभेद होऊ लागल्याने दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. (Ankita Lokhande and Vicky Jain)
त्यानंतर अभिनेत्रीने पेशाने व्यावसायिक असणाऱ्या विकी जैनसह लग्नगाठ बांधली. १४ डिसेंबर रोजी अंकिताने विकीशी लग्न केले. मुंबईतील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये या दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्यासाठी त्यांनी कोट्यावधींचा खर्च केला होता. अंकिता व विकी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. ‘बिग बॉस १७’मध्ये या जोडीने कपल एंट्री घेतलेली पाहायला मिळाली. ‘बिग बॉस’च्या घरात अंकिता व विकी यांच्या नात्यातील चढ-उतार पाहायला मिळाले.
‘बिग बॉस’मध्ये दोघांमध्ये अनेकदा वाद झाले. मात्र दोघांमध्येही तितकंच प्रेम असलेलं पाहायला मिळालं. अशातच अंकिताने विकीबरोबरचे खास रोमँटिक फोटो शेअर करत त्यांच्या प्रेमाला ६ वर्ष पूर्ण झाली असल्याचं म्हटलं आहे. “एकमेकांना आवडू लागल्यापासून ६ वर्ष पूर्ण झाली”, असं कॅप्शन देत रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.
अंकिताच्या नवऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, विकीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर त्याने जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून (JBIMS) एमबीए केलं. एमबीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विकीने त्याच्या कुटुंबाच्या व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली. लाकडी कोळसा, पीआयटी कोळसा व बिटुमिनस कोळसा असा त्यांचा व्यवसाय आहे. विकीचा कौटुंबिक व्यवसाय हा रिअल इस्टेटमध्येही पसरलेला आहे. ‘महावीर बिल्डर्स अँड प्रमोटर्स’ असं त्याच्या कंपनीचं नाव आहे.