छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांच्या यादीत ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ हे नाव आवर्जून घेतलं जातं. या मालिकेतून अभिनेत्री तितिक्षा तावडे हिने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. नुकत्याच पार पडलेल्या झी मराठी पुरस्कार सोहळ्याला कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. या सोहळ्यात अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेत्री एकता डांगर या दोघींना सर्वोत्कृष्ठ मित्र हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मालिकेतील या दोघींची मैत्री कौतुकास्पद आहे. त्यांच्या निखळ मैत्रीचं प्रतीक म्हणून त्यांना सर्वोत्कृष्ठ मित्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. (Titeeksha Tawde Emotional)
बरं ही मैत्री पडद्यावरच नव्हे तर पडद्यामागेही तितकीच घट्ट आहे. मूळची मुंबई, महाराष्ट्रातून नसलेल्या एकता डांगरला तितिक्षाने तिच्या घराची कधीच कमतरता भासू दिली नाही. नवी ओळख, नवी मैत्री असूनही तितिक्षाने एकताला कायम आपलंस केलं. तितिक्षाच्या या स्वभावाचं कायमच कौतुक होत असतं. अशातच मंचावर एकत्र हा पुरस्कार स्वीकारताना ही एकता तितिक्षा बद्दल भरभरून बोलली, आणि त्यावेळी तितिक्षाच्या डोळ्यात पाणी आलेलं पाहायला मिळालं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे.
मंचावर पुरस्कार स्वीकारल्यानंतर एकता म्हणाली, “मला हसायला ही येत आहे, आणि रडूही येतंय. मी खूप भाग्यवान आहे आणि मी खूप आनंदी आहे की, की मला तुझ्यासारखी मैत्रीण आहे. हा सेट आणि तू मला घरी असल्याचं नेहमीच भासवता. मी मुंबईची नाही आहे, मी महाराष्ट्रातूनही नाही आहे, मला माहित नाही मराठी कसं बोलतात, हे सगळं असताना ती एकटी अशी मुलगी आहे जी कायम माझी विचारपूस करायला माझ्याजवळ येते. माझी चौकशी करते. असं म्हणत तिने भावुक होत तितिक्षाचे आभार मानले.
तर हा व्हिडीओ शेअर करत एकताने कॅप्शन देत म्हटलं आहे की, “लाइट्स, कॅमेरा आणि ऍक्शनच्या जगात, मला फक्त एक सहकलाकार नाही तर एक खरा मित्र मिळाला. आम्ही एकत्र हसलो, रडलो आणि पडद्यावर, तसेच पडद्यामागे असंख्य क्षण साजरे केले. सर्वोत्कृष्ट मित्रांसाठी पुरस्कार जिंकणे हा आमच्यातल्या खऱ्या मैत्रीचा पुरावा आहे. ती फक्त माझी सहकलाकार नाही, तर ती माझी विश्वासू मैत्रीण, माझी प्रेरणा आणि मी दररोज पाहणारी एक व्यक्ती आहे. मी हे नेहमी म्हणते आणि आज पुन्हा म्हणेन की “सातव्या मुलीची सातवी मुलगी” हा सेट माझ्यासाठी नवं घर बनवल्याबद्दल कायम धन्यवाद.”