कलाक्षेत्रात स्वतःच एक वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी कलाकार धडपड करत असतात. आज कित्येक कलाकार अगदी सामान्य कुटुंबातून अभिनयक्षेत्रात आले आहेत. कुटुंबातील एकही व्यक्ती अभिनयक्षेत्रात नसताना काही कलाकारांनी धाडसी पाऊल उचललं. तर काही कलाकार त्यांचे आई किंवा वडील कलाक्षेत्रात कार्यरत आहेत म्हणून अभिनयाकडे वळले. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. तेजस्विनीची आई ज्योती पंडित या सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत. मात्र असं असतानाही त्यांना व त्यांच्या मुलीला बिकट परिस्थितीचा सामना करावा लागला होता. तेजस्विनीने स्वतः याबाबत भाष्य केलं होतं. (Tejaswini pandit talk about her personal life)
तेजस्विनीची आई उत्तम अभिनेत्री असली तरी तिच्या घरची परिस्थिती मात्र बिकट होती. जेवणासाठीही ती व तिच्या कुटुंबाकडे पैसे नव्हते. याचबाबत तेजस्विनीने एका कार्यक्रमात भाष्य केलं होतं. ती म्हणालेली, “आई माझी उत्तम अभिनेत्री होती. पण ती जी नाटकं करायची त्यावरच आमचं घर चालत होतं. माझ्या वडिलांना दोनवेळा हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता. त्यामुळे त्यांनी व्हिआरएस घेतली होती. ते आम्हा दोन्ही मुलींना मोठं करत होते. माझे बाबा घरातील आई होती आणि आई बाबा बनून बाहेर कमवत होती”.
नाटकासाठी तिला तेव्हा ६०० ते ७०० रुपये मिळत होते. एक वेळ अशी आली की, आमच्या घरामध्ये फक्त एक रुपयाच होता. खायलाही काही नव्हतं. फक्त घरामध्ये पीठी साखर आणि मैदा होता. तेव्हा स्टोव्हवर मैद्याचे बिस्किट्स करुन आम्ही खाल्ले. ती रात्र तशीच घालवली. आज माझ्याकडे, माझ्या आईकडे जे काही आहे त्याची किंमत एवढ्यासाठीच आहे की, ते दिवस आम्ही पाहिले आहेत. शिवाय आम्ही खूप कर्जबाजारी झालो. कर्ज फेडण्यासाठी पैसेही नव्हते. घरातली लाईटही कापली. जवळपास अडीच महिने अंधारात राहिलो. त्याक्षणाला मला असं वाटलं की, आता आपण थांबायचं नाही. मेहनत करुन आपण ही परिस्थिती बदलुया. म्हणूनच मी लावणीचे कार्यक्रम करायला लागले. तिथे मला महिन्यातून तीन कार्यक्रम केल्यानंतर खूप चांगले पैसे मिळालया लागले”.
आणखी वाचा – २१ वर्षांपूर्वी असे दिसायचे वैभव मांगले, सोशल मीडियावर शेअर केला जुना फोटो, नेटकरी म्हणाले, “गेलेले केस…”
“पुण्यामध्ये एक प्रसिद्ध नाइट वेअर कंपनी आहे त्याची मी जाहिरात केली. त्याचे माझ्याकडे चांगले पैसे आले. तेव्हा सगळ्यात आधी जाऊन मी लाईट बिल भरलं. जेव्हा अडीच महिन्यानंतर घरामध्ये लाईट आली तो क्षण मी शब्दांमध्ये सांगू शकत नाही. एका अभिनेत्रीच्या घरात लाईट नसते तेव्हा कशा नजरेने माणसं तुमच्याकडे बघतात, तुमच्या परिस्थितीकडे कशाप्रकारे बघतात हेही मी शब्दांस व्यक्त होऊ शकत नाही. कारण हे आम्ही अनुभवलं आहे. त्यानंतर मी थांबली नाही. परिस्थितीवर मात करुत पुढे गेले”. तेजस्विनीचा हा संपूर्ण प्रवास खरंच इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.