अभिनेता आस्ताद काळे व अभिनेत्री स्वप्नाली पाटील हे मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत. आस्ताद व स्वप्नाली यांची मालिकेदरम्यान भेट झाली आणि त्यादरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली. कालांतराने या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आणि ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी दोघांनी नोंदणी पद्धतीने लग्नगाठ बांधली. आस्तादबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेताना स्वप्नालीने बराच वेळ घेतला. याबाबत अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. स्वप्नाली व आस्तादने नुकतीच सुलेखा तळवलकर यांच्या ‘अगं आणि अहो’ या मुलाखतीदरम्यान बऱ्याच गप्पा मारल्या. (Astad kale and swapnali patil)
यावेळी बोलताना स्वप्नालीला असा प्रश्न विचारण्यात आला की, “स्वप्नाली तुझं हे दुसरं लग्न आहे. म्हणून तू वेळ घेतला होतास की तुला धास्ती होती?, आपण नंतर ताकही फुंकून पितो म्हणून तू थांबली होतीस का?”, यावर उत्तर देत स्वप्नाली म्हणाली, “हो. भीती होती. ज्या चुका मी केल्या होत्या त्या मला पुन्हा करायच्या नव्हत्या. समोरची व्यक्ती कशी असेल त्यापेक्षा आपण त्यावेळेला काय केलं, आपण त्यावेळेला घाई केली होती का?, तर हो मी घाई केली होती. कदाचित त्यावेळेला मी थांबले असते तर हे झालं नसतं. किंवा वेगळं चित्रही असतं. काय असतं, वयवर्षे २३ होतं. नाही म्हटलं तरी, जवानीचा जोश वगैरे असतो. काही चुका आपण करतो. आणि त्या वयात सगळं होईल, असं वाटतं, आणि चिंताही नसते. ज्या चुका मी केल्या आहेत वा तेव्हाचं माझं वागणं अल्लड असेल तर ते पुन्हा होऊ द्यायचं नव्हतं. त्याच त्याच चुका पुन्हा करायच्या नाहीत हा एक मंत्र मी जपायचा प्रयत्न करतेय. नवीन चुका रोज करायच्या. मी त्या प्रसंगातून जात होते”.
अभिनेत्री पुढे म्हणाली, “सेटवर सगळ्यांना माहित होतं. आस्तादने मी आवडते असं सांगितलं होतं. हर्षदा ताईलाही सर्व माहित होतं. त्यामुळे थोडंफार चिडवणं वगैरे सुरु असायचं. तेव्हा मी हर्षदा ताईला जाऊन सांगितलं की, माझ्या आयुष्यात आता काहीतरी वेगळं घडतंय त्यामुळे सेटवर हे चिडवणं वगैरे नको. आणि त्यावेळेपासून तिने माझ्याबरोबर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आदर केला. आस्तादबद्दल मी बरंच ऐकलं होतं की त्याचा नेमका स्वभाव कसा आहे. तो चिडका आहे, खूप रागीट आहे, हे सर्व माहित होतं. आणि अनुभवातूनही मला ते कळत होतं. म्हणूनही मी थांबत होते”.
पुढे ती म्हणाली, “आमचं जुळेल का हा प्रश्न मला पडत होता. आणि जुळलं तर आधीसारखं पुन्हा काहीच घडायला नको असं वाटतं होतं. मग त्याच्या आधीच थांबायचं हा सगळा विचार होता. पण एका क्षणाला मी थांबले. कारण आमचे स्वभाव एकसारखे आहेत. आम्ही दोघेही बऱ्यापैकी रागीट आहोत. त्यानंतर मी थोडा वेळ घेतला आणि एका क्षणाला मीचं त्याच्या लग्नासाठी मागे लागले”.