घोडबंदर मार्गावरील गायमुख घाटातील रस्त्याचे दुरुस्तीकरण करून डांबरीकरण केले जाणार आहे. त्यासाठी २४ मेपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम हाती घेतले गेले आहे. पर्यायाने या रस्त्याच्या बांधकामासाठी वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत. त्यांमुळे ठाणे-घोडबंदर रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. यासाठी एका मार्गाची वाहतूक थांबवली जात आहे आणि यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
अशातच मराठी अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनादेखील या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. याबद्दल अभिनेत्रीने सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. सुप्रिया पाठारे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे त्यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि त्यांनी या व्हिडीओमधून ठाणे-घोडबंदर रोडवरील या वाहतूक कोंडीबद्दल त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करत नागरिकांना महत्त्वाचे काम नसल्यास प्रवास न् करण्याचे किंवा प्रवास करायचाच असल्यास वेळेत निघण्याचे आवाहनही केले आहे.
या व्हिडीओमध्ये सुप्रिया यांनी असं म्हटलं आहे की, “नमस्कार मी सुप्रिया पाठारे, माझं शूटिंग मढला असतं. मी सकाळी ठाण्यावरुन मढला जाण्यासाठी निघाले आहे आणि आता साडेबरा वाजले असून मी अजूनही मढला पोहोचले नाही. म्हणजे पूर्णत: पाच तास झाले आहेत. घोडबंदर रोडवर पूर्णपणे ट्रॅफिक जाम आहे. एकेक तास गाड्या थांबवून ठेवल्या जात आहेत. मुलुंड-ऐरोली ब्रीजवर कुठेतरी कंटेनर उलटला आहे. त्यामुळे तिथेही ट्रॅफिक जाम आहे”.
आणखी वाचा – “नशिबाने अशी पलटी मारली की…”, लीला-ऐजेचा एकमेकांसाठी भन्नाट उखाणा, म्हणाला, “लीला दिसते बरी पण…”
यापुढे त्यांनी “त्यामुळे तुमचं जर महत्त्वाचे काम नसेल तर कृपया घराबाहेर पडू नका. कारण खाण्या-पिण्याचे खूप हाल होत आहेत आणि नाटक वाल्यांसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांचे प्रयोग त्यांनी वेळेत निघा. कारण खूप ट्रॅफिक आहे आणि यामध्ये तुम्ही अडकायला नको”.
दरम्यान, सध्या ठाणे ते घोडबंदर या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या मार्गावरील अवजड वाहनांना पर्यायी मार्गांनी वळवण्यासाठी वाहतूक पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत.