अभिनेत्री सई ताम्हणकर ही तिच्या बोल्ड व बिनधास्त व्यक्तिमत्त्वामुळे नेहमीच चर्चेत असते. तसेच सईच्या सौंदर्याचे व अभिनयाचे लाखो दिवाने चाहते आहेत. मराठी तसेच हिंदी चित्रपटांमधुन सईने प्रेक्षकांमध्ये छाप पाडली. सोशल मीडियावरही सई बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. दरम्यान सईचा पापराझीबरोबरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यांत सई त्या पापराझीला ‘तुझा फोन फोडू का?’, असा सवाल करताना दिसत आहे. (Saie Tamhankar Angry On Paparazi)
एका पापाराझी फोटोग्राफरने सईचा एक व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. सई समोरुन येताच तो फोटोग्राफर सईला म्हणतो की, “मॅम तुमचा आजच एक मुव्ही मी पाहिला मितवा”, हे ऐकताच सईला धक्का बसतो. सई इतर फोटोग्राफर्सकडे पाहून म्हणते की, “याचा फोन फोडू का मी? मी मितवा सिनेमात नाही आहे”, तरीही त्या फोटोग्राफरचा विश्वास बसत नाही की सई ‘मितवा’ सिनेमात नाही आहे. शेवटी सई त्याच्या हातातून फोन खेचून घेते आणि त्या फोटोग्राफरचं शूटिंग करु लागते.
त्या फोटोग्राफरचा व्हिडीओ शूट करत सई त्याला विचारते की, सांग मी कोणत्या सिनेमात होते? तो तिला सांगण्याचा प्रयत्न करतो की, “स्वप्नील जोशीबरोबर तुम्ही त्या सिनेमात होता, त्याच्या बायकोचं काम केलं आहे”, सईने हे संभाषण त्या फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे. हा सईबरोबरचा मजेशीर व्हिडीओ त्या पापाराझीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला असून कॅप्शन देत असे म्हटले आहे की, “खरंतर मला ‘तू ही रे’ सिनेमाबद्दल बोलायचे होते”. सई व त्याच्या या गोड फॅनचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
फोटोग्राफरने शेअर केलेल्या या व्हिडीओवर सईची कमेंट लक्षवेधी ठरली आहे. सईने या व्हिडीओवर कमेंट करत “अगदी बरोबर, ‘तू ही रे’ आता कसे आठवलं?”, त्यावर उत्तर देत तो म्हणाला की, “आधीच आठवले होते मॅम, पण सुंदर सईला पाहून सर्वकाही विसरायला झाले”.