Reshma Shinde Kelvan : सध्या सर्वत्र लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अशातच मनोरंजन विश्वातही लग्नाचे वारे वाहू लागले असल्याचं पाहायला मिळतंय. काहींचे केळवण, काहींच्या लग्नापुर्वीच्या विधींचे फोटो समोर येऊ लागले आहेत. अशातच ‘रंग माझा वेगळा’ आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्रीने थेट केळवणाचे फोटो शेअर करत लग्नबंधनात अडकणार असल्याची खुशखबर चाहत्यांसह शेअर केली. त्यामुळे अभिनेत्री वैयक्तिक आयुष्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे. तिने शेअर केलेल्या सोशल मीडियावरील पोस्ट चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील कलाकारांनी आणि इतर कलाकारांनी अभिनेत्रीचं थाटामाटात केळवण केलं.
हर्षदा खानविलकर, अनघा भगरे, विदिशा म्हसकर, शाल्मली टोळ्ये, आशुतोष गोखले, सुयश टिळक या कलाकारांनी मिळून अभिनेत्रीचं केळवण केलं. रेश्माच्या केळवणासाठी खास फुलांची सजावट, पंचपक्वान्नचा थाट यावेळी करण्यात आला होता. भजी, आलू वडी, पनीरची भाजी, बटाट्याची भाजी, कारळ्याचे काप, कोशिंबीर, पोळी, भात, तूप, शेवयाची खीर, गुलाब जामुन, रस-मलाई, जिलेबी, आइस्क्रीम असे गोड-धोडचे पदार्थ रेश्माच्या केळवणासाठी खास करण्यात आले होते.
आणखी वाचा – Video : नाचता येईना अंगण वाकडं! शाहरुख खानच्या लेकीचा डान्स पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, व्हिडीओ व्हायरल
केळवणाचा सुंदर असा व्हिडीओ रेश्माने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने असं म्हटलं आहे की, “केळवणाच्या पानात जसे वेगवेगळे पदार्थ असतात, प्रत्येकाचा रंग वेगळा असतो, चव वेगळी असते, काही आंबट काही गोड, काही झणझणीत, तर काही चटपटीत. एखादा पदार्थ नसला, तर पान अपूर्ण राहतं. अगदी तसंच माझं नातं या सगळ्या माझ्या माणसांबरोबर आहे. माझ्या माणसांचा हात धरून नवीन आयुष्याची सुरुवात करतेय”. यावेळी रेश्माने नवऱ्याचं नाव न घेता उखाणाही घेतला. “भेटला पहिल्यांदा…तेव्हा त्याने विचारलं व्हॉट इज युअर नेम, तुम्हा सगळ्यांचं असंच राहूदे माझ्यावर प्रेम”, असा उखाणा अभिनेत्रीने घेतला आहे.
अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर अभिनेता सुयश टिळकने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “तुला कायम आनंद आणि प्रेम मिळत राहो, या शुभेच्छा!”. तर शर्वरी जोगने लिहिले आहे की, “किती गोड. अभिनंदन”. तर विदिशा म्हसकरने कमेंट करत म्हटलं आहे की, “मी हा व्हिडीओ लूपवर बघत आहे. खूप खूप खूश राहा. आता कुठे जाणार जाऊन जाऊन, चिडायचंसुद्धा इथेच, रडायचंसुद्धा इथेच आणि खळखळून हसायचंसुद्धा इथेच”. अनघाने लिहिले, “अशीच या रीलसारखी आनंदित राहा. आमंच खूप प्रेम आहे तुझ्यावर. शेवटी दीपाला तिचा कार्तिक मिळाला आहे. मी अशीच आयुष्यभर श्वेतासारखी त्रास देत राहीन”, असं गमतीत म्हटलं आहे.