Marathi Actor On Maharashtra vidhansabha Results 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या निकालाने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. दरम्यान, पहिल्या फेरीपासूनच महायुतीला अधिक मत मिळाल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीची लाट आहे हे निकालाने स्पष्ट केलं आहे. कारण २०० हून अधिक ठिकाणी महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीला आत्ताच्या कलांनुसार अवघ्या ५० जागांवर आघाडी मिळाली आहे. महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत यश मिळालं होतं. मात्र, विधानसभा निवडणुकीत राज्यात त्याच्या बरोबर उलटं चित्र पाहायला मिळालं. या निकालांवर राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळींसह आता कलाकार मंडळींनीही प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.
मराठी मनोरंजन विश्वातील कलाकार या नेते मंडळींच्या विजयावर अभिनंदनाचा वर्षाव करताना पाहायला मिळत आहेत. अभिनेता प्रसाद ओकने या निवडणुकीच्या निकालांवर मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया देत असं म्हटलं आहे की, “जो हिंदू हित की बात करेगा… वही देश पर राज करेगा!!”. तसेच यापूर्वीच्या स्टोरीमध्ये प्रसादने, “धर्मो रक्षति रक्षित: हिंदू ऐक्य चिरायु होवो” असं म्हटलं आहे. तर अभिनेता उत्कर्ष शिंदेने बारामतीचा निकाल लागल्यावर अजित पवारांचं अभिनंदन केलं आहे. अजित पवारांच्या विरुद्ध त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार निवडणूक लढवत होता. मात्र, काका विरुद्ध पुतण्याच्या लढाईत मतांमध्ये मोठी तफावत ठेवून अजित पवार यांनी बाजी मारली.
नागपूर दक्षिण- पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस विजयी झाल्यावर अभिनेता अभिजीत केळकरने पोस्ट शेअर करत त्यांचं अभिनंदन केल्याचं पाहायला मिळालं. “असंख्य काजव्यांच्या एकत्र येण्याने रात्रीचा काळोख कमी होत नाही. पौर्णिमेचा चंद्र जरी सौम्य असला तरी रात्र प्रकाशमय केल्याशिवाय राहत नाही”, असं म्हटलं आहे. तर या पोस्टला कॅप्शन देत त्याने “धुरळा उडाला, सूर्य पुन्हा एकदा तळपला देवेंद्र फडणवीसजी, आपलं मनापासून, त्रिवार अभिनंदन”, असं म्हणत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध गायिका नेहा भसीनला गंभीर आजार, तब्बल १० किलो वजन वाढलं, त्रासामुळे रडू लागली अन्…
अभिजीतप्रमाणे ‘बिग बॉस’ विजेती लोकप्रिय अभिनेत्री मेघा धाडेने सुद्धा देवेंद्र फडणवीसांचं जुनं भाषण इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत त्यांचं कौतुक केलं आहे. आता राज्यात नेमकं कोणाचं सरकार येणार?, कोण राज्याचा मुख्यमंत्री होणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.