बरेच असे कलाकार आहेत जे त्यांच्या अभिनयामुळे कायमच चर्चेत असतात. मात्र अभिनय करताना त्यांना कायमचं ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागते. बरेचसे कलाकार असे आहेत जे या ट्रोलिंगवर सडेतोडपणे भाष्य करतात. तर काही कलाकार असे आहेत जे या ट्रोलिंगकडे सहसा दुर्लक्ष करतात. कित्येकदा हे कलाकार त्यांनी पोज देत शेअर केलेल्या फोटोंवरून, कपड्यांवरून ट्रोल होताना दिसतात. अशातच हटके व बोल्ड पोज देत शेअर केलेल्या एका फोटोवरून एका मराठमोळ्या अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. (Resham Shrivardhan Troll)
एकांकिका, रंगभूमी, मालिका, सिनेमे, वेबसीरिज या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रेशम श्रीवर्धन. रेशमने आजवर मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतही बरंच काम केलं आहे. ‘एक थी बेगम’ या प्रचंड गाजलेल्या वेबसीरिजमध्ये रेशमची महत्वपूर्ण भूमिका होती. रेशमचा सोशल मीडियावरील वावरही बऱ्यापैकी मोठा असतो. रेशम नेहमीच हटके अंदाजात फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच रेशमने शेअर केलेल्या एका बोल्ड फोटोची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.
रेशमने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. या बोल्ड फोटोची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या फोटोला पाहून अनेकांनी रेशमला चांगलंच ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “काय फालतूपणा आहे, आता फेमसाठी एवढे वाईट दिवस आले का. हे तिच्याकडून अपेक्षित नाही”. तर आणखी एका चाहत्याने कमेंट करत रेशमला असे बोल्ड फोटोशूट न करण्याची विनंती केली आहे.
त्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “मॅडम तुम्ही छान आर्टिस्ट आहात, तुम्हाला कामं मिळतील मिळत राहोत पण तुम्ही त्या विचाराने हे असले फोटो शूट करत असाल तर कृपया बंद करा, खूप आदर आहे तुमच्या कामाबद्दल”.
रेशमला अनेकांनी कमेंट करत त्यांच्या ‘कामाबद्दल आदर आहे, तुम्ही असे फोटोशूट करू नका’, अशी विनंती केली आहे. यावर अद्याप रेशमने काहीच भाष्य केलेलं नाही. रेशमच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती मालिकाविश्वाकडून वेबसीरिजकडे वळली आहे.