मराठी चित्रपटसृष्टीला खऱ्या अर्थाने समृद्ध करणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. लक्ष्मीकांत यांच्या प्रत्येक भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात आहेत. असा कलाकार होणे नाही असं प्रत्येकजण म्हणतो. पण जेव्हा लक्ष्मीकांत यांचं निधन झालं त्यानंतर मात्र त्यांच्या कुटुंबियांना बऱ्याच प्रसंगांचा सामना करावा लागला. लक्ष्मीकांत यांच्य पत्नी व सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी याबाबत भाष्य केलं आहे. तसेच त्यांच्या खासगी आयुष्यामधील चढ-उतारांविषयी प्रिया यांनी काही खुलासे केले.
प्रिया बराच काळ चंदेरी दुनियेपासून दूर राहिल्या. पण आता बऱ्याच वर्षांनंतर कर्लस मराठी वाहिनीवरील ‘सिंधूताई माझी आई’ या मालिकेमधून त्या कमबॅक करत आहेत. या मालिकेनिमित्त एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत त्यांना “कलाक्षेत्रामध्ये काम करत असतान सिंगल मदर म्हणून वावरणं अवघड गेलं का? काही तुम्हाला याबाबत अनुभव आला का?” असा प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी अगदी दिलखुलासपणे उत्तर दिलं.
प्रिया म्हणाल्या, “हो. मला माझ्या मुलांना घरापासून लांब ठेवावं लागलं. माझी मुलं पुण्यामध्ये लहानाची मोठी झाली. त्यांना मला हॉस्टेलमध्ये ठेवावं लागलं. कारण मला आई-वडील, सासू-सासरे, बहीण-भाऊ कोणीच नाही. जरी हे सगळे असते तरी त्यांनी माझ्या मुलांना सांभाळावं ही अपेक्षा मी कधीच केली नसती”. लक्ष्मीकांत यांच्या निधनानंतर मुलांना सांभाळणं तसेच संपूर्ण डोलारा पुन्हा एकदा उभा करणं हे प्रिया यांच्यासाठी मोठं आव्हान होतं.
पुढे त्या म्हणाल्या, “माझ्या सासरकडची सगळी माणसं आहेत. पण प्रत्येकाचे प्रत्येकाला संसार आहेत. लक्ष्मीकांत गेल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये कोणीच नव्हतं. त्यामुळे मला मुलांना नाईलाज म्हणून हॉस्टेलला ठेवावंच लागलं. पुण्यामध्ये सिंहगडजवळच दोघंही दहावीपर्यंत राहीले. थेट एक-दोन महिना मोठं होताना मी त्यांना बघत होते”. हे सारं बोलत असताना आपसुकच प्रिया यांना रडू कोसळलं.