प्रत्येक कलाकारचा चाहता वर्ग हा असतोच. अभिनयाच्या जोरावर ही कलाकार मंडळी आपला चाहतावर्ग निर्माण करतात. तर बरेचदा कलाकार मंडळीही इतर कलाकारांचे चाहते असतात. ते स्वतःच्या फॅन बद्दल बरेचदा भाष्यही करतात. एखाद्या कलाकाराची हटके स्टाईल, तिचा स्वभाव आवडणं हे एखाद्या कलाकाराबाबतही घडू शकतं. अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्याने त्याच्या क्रशबद्दल भाष्य केलं होतं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता निखिल बने हा एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा खूप मोठा चाहता आहे. (Nikhil Bane Heartbroken)
‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत निखिलने त्याच्या फॅन मुमेंट व त्याच्या पहिल्या क्रशबद्दल भाष्य केलं. यावेळी बोलताना तो म्हणाला, “माझी क्रश पूजा सावंत आहे. आणि माझी फॅनही पूजा सावंतच आहे”. निखिल बनेचा हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. निखिल बनेची क्रश असलेल्या पूजा सावंत हिने ‘आमचं ठरलं’ म्हणत साखरपुडा सोहळा उरकल्याची आनंदाची बातमी शेअर केली आहे. पूजाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या बॉयफ्रेंडबरोबरचे फोटो शेअर करत रिंग फ्लॉन्ट केली आहे. अद्याप तिने तिच्या होणाऱ्या पतीचे नाव सांगितले नसून त्याचा चेहराही सर्वांपासून लपवून ठेवला आहे.
पूजाच्या साखरपुड्याची बातमी समोर येताच निखिल बने दुखी झाला आहे. ‘निखिल बने हार्टब्रोकन’ असं लिहीत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील कलाकारांनी त्याचं सांत्वन केलं आहे. ‘सपना तुटा तो दिल कभी जलता है’ हे गाणं वापरत त्यांनी निखिल बनेसाठी स्टोरी पोस्ट केली आहे. शिवाली परब, चेतना भट या कलाकारांनी निखिल बनेसाठी ही पोस्ट शेअर केली आहे.
‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत निखिल बने पूजा सावंतबद्दल बोलताना असंही म्हणाला की, “प्रमोशननिमित्त एकदा पूजा आमच्या हास्यजत्रेच्या सेटवर आली होती.तेव्हा ती स्वतः मला भेटायला आली आणि म्हणाली, मी तुझी खूप मोठी फॅन आहे. मला तुझं काम खूप आवडतं असं ती बोलताच यावर मी काय प्रतिक्रिया देऊ हे मला कळतंच नव्हतं. आणि मग आम्ही एकत्र फोटो काढला” असं म्हणत त्याने आठवण शेअर केली होती.