सध्या सिनेसृष्टीत एकामागोमाग एक कलाकार मंडळी त्यांच्या प्रेमाची कबुली देताना दिसत आहेत. अमृता देशमुख व प्रसाद जवादे ही जोडी नुकतीच विवाहबंधनात अडकली. याशिवाय स्वानंदी टिकेकर व आशिष कुलकर्णी यांचा साखरपुडा सोहळा संपन्न झाला असून लवकरच ही जोडी ही लगीनगाठ बांधणार आहे. तसेच आता पूजा सावंतने ही ‘आमचं ठरलं’ म्हणत बॉयफ्रेंडबरोबरचा पाठमोरा फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली. यानंतर आता सिनेसृष्टीतील आणखी एक लोकप्रिय जोडीने साखरपुडा सोहळा उरकला आहे. (Amruta Bane And Shubhankar Ekbote)
‘सन मराठी’ वाहिनीवर सध्या ‘कन्यादान’ ही मालिका सुरु आहे. या मालिकेला प्रेक्षक विशेष पसंती देताना पाहायला मिळत आहेत. या मालिकेत अभिनेते अविनाश नारकर मुख्य भूमिकेत असून उमा सरदेशमुख, संग्राम साळवी, अनिशा सबनीस, अमृता बने, प्रज्ञा चवंडे, शुभंकर एकबोटे हे कलाकारही या मालिकेत प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत. अशातच अमृता बने व शुभंकर एकबोटे या मालिकेतील ऑनस्क्रीन कपलने खऱ्या आयुष्यातही साखरपुडा सोहळा उरकला असल्याची आनंदाची बातमी समोर आली आहे.
‘कन्यादान’ मालिकेत वृंदा-राणा ही जोडी खऱ्या आयुष्यातही प्रेमात असल्याचं समोर आलं आहे. शुभंकर व अमृता दोघेही ‘कन्यादान’ या मालिकेच्या सेटवर पहिल्यांदा भेटले. या मालिकेमुळे त्यांच्यात मैत्री झाली आणि हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर आता थेट अमृता व शुभंकर यांचा साखरपुडा सोहळा संपन्न झाला आहे. दोघांच्या साखरपुडा सोहळ्याचे अनेक फोटोस सोशल मीडियावरून व्हायरल झाले आहेत. अखेर ऑनस्क्रीन दिसणारी ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकत्र पाहणं रंजक ठरणार आहे.
अमृता व शुभंकर यांच्या साखरपुडा सोहळ्याचे अनेक फोटोस सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चाहतेही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. तर अनेक कलाकार मंडळी अमृता व शुभंकरला शुभेच्छा देत त्यांचं अभिनंदन करत आहेत. ‘रंग माझा वेगळा’, ‘जय जय स्वामी समर्थ’, ‘श्री गुरुदेव दत्त’, ‘कन्यादान’, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकांमधून अमृताने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. शुभंकरने ‘कन्यादान’ या मालिकेतून तर ‘चौक’, ‘धर्मवीर’ या चित्रपटांमधून अभिनयाची छाप सोडली आहे.