Pooja Sawant Engagement : कलाकार मंडळींचं रिलेशनशिप, लग्न एकूणच काय तर त्यांचं खासगी आयुष्य जाणून घेण्यात अनेकांना रस असतो. एखादा अभिनेता किंवा अभिनेत्रीने जोडीदाराबरोबरचा फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर केला की, तुफान चर्चा रंगतात. आता असंच काहीसं मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंतबाबत घडलं आहे. पूजा नेमकं कोणाला डेट करते? याबाबत यापूर्वी अनेक चर्चा रंगल्या. तिचं काही मराठी अभिनेत्यांबरोबरही नाव जोडलं गेलं. मात्र आता या सगळ्या चर्चांना पूजाने पूर्णविराम दिला आहे. तिने सोशल मीडियावर खास फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली आहे. (Pooja Sawant Relationship)
पूजाने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे काही फोटो शेअर केले. या फोटोला लक्षवेधी कॅप्शन देत प्रेमात असल्याचं चाहत्यांना सांगितलं आहे. पूजाचे हे फोटो पाहून सगळ्यांनाच सुखद धक्का बसला आहे. याआधी कधीच तिने आपल्या नात्याबाबत उघडपणे भाष्य केलं नव्हतं. “तू कोणाच्या प्रेमात आहेस का?” असंही पूजाला बऱ्याचदा विचारलं गेलं. मात्र तिने नेहमीच याबाबत बोलणं टाळलं. अखेरीस तिने आपल्या जोडीदाराची ओळख सगळ्यांना करुन दिली आहे. पूजाने बॉयफ्रेंडसह साखरपुडा करत सगळ्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
पूजाने शेअर केलेल्या फोटोमध्ये जोडीदाराचा चेहरा लपवला आहे. ती या व्यक्तीला मिठी मारताना दिसत आहे. तसेच अद्यापही पूजा ज्या व्यक्तीच्या प्रेमात आहे ती व्यक्ती कोण? तिचं नाव काय हेही गुलदस्त्यातच आहे. तिने शेअर केलेल्या फोटोंना सुंदर कॅप्शन दिलं आहे. “opening my heart to a new chapter with my special one” असं पूजाने म्हटलं आहे.
इतर दोन फोटो शेअर करत प्रेमाचा नवा प्रवास सुरु करत असल्याचं पूजाने म्हटलं आहे. या फोटोंमध्ये पूजाच्या हातामध्ये अंगठी दिसत आहे. तसेच दोघांनीही पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. चाहत्यांसह अनेक मराठी कलाकारांनी अभिनंदन म्हणत पूजावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर पूजाच्या बहिणीने जीजू म्हणत कमेंट केली आहे. आता पूजा नक्की लग्न कधी करणार? तसेच तिचा जोडीदार नेमका कोण आहे? हे जाणून घेण्यात चाहत्यांना अधिक उत्सुकता लागली आहे.