मराठी सिनेसृष्टीतील सर्वात यंग व क्युट कपल म्हणून अभिनेता सिद्धार्थ चांदेकर व अभिनेत्री मिताली मयेकर यांना ओळखले जाते. गेल्या सहा वर्षांपासून दोघांनी एकमेकांना डेट केल्यानंतर २०२१ मध्ये ते विवाहबंधनात अडकले, ज्याची चर्चा मराठी मनोरंजन विश्वात रंगली होती. नुकत्याच दिवाळी पाडवा निमित्त ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थने बायकोचं भरभरून कौतुक केलं. (Siddharth-Mitali Diwali Padwa)
मिताली लग्नानंतरच्या दोन वर्षात जबाबदारीने मोठी झाली आहे का याबद्दल बोलताना सिद्धार्थ म्हणाला, “गेली सहा वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतोय. यांतील गेल्या आठ महिन्यांत मितालीमध्ये जास्त फरक पडला आहे. आणि आठ महिन्यांत का तर मितालीला तिचं एक नवीन वेड सापडलं आहे. फार आधीपासून हे वेड तिच्यात होतं पण हे वेड मिळवण्यासाठी कसं झगडावं हे तिने शोधून काढलं. ते वेड म्हणजे फिरणं. सध्या मिताली फिरण्यावर विशेष मेहनत घेत आहे. तिला फिरायला भयंकर आवडतं. आणि तिने जर का हे ठरवलं आहे की, मला जग फिरायचं तर त्या दृष्टीने काम करायला हवीत, आणि त्यासारखी काम करायला हवीत हे तिने समजून घेतलंय. एखाद्या ठिकाणी फिरायला जायचं आहे तर त्या ठिकाणी तिकिटाचे पैसे तिने स्वतः भरले, तर त्या ठिकाणी राहण्यासाठी, फिरण्यासाठी तिथल्या कंपनींबरोबर संवाद साधून त्यांच्याशी जाहीरांतींबाबत चर्चा करून व्यावसायिक नातं ती सांभाळते”.
“स्वतः सुद्धा ती घरात काम करताना कंपनीसारखचं म्हणजे जसं की चार पाच लोक हाताखाली कामाला आहेत असं वागते पण ती एकटीच सगळ्या गोष्टी सांभाळत असते. आणि फिरायला जाण्यासाठी त्या सर्व गोष्टी ती स्वतः जुळवून आणते. याला ढोबळ भाषेत सांगायचं झालं तर, फुकटात फिरायला जाता येणं असं म्हणतात. पण ते फुकटात फिरायला जाणं याच्यासाठी तुम्हाला पैशाव्यक्तिरिक्त काही तरी देण लागतं. तिची बौद्धिक क्षमता, तिची त्या कंपनींबरोबर बोलण्याची पद्धत हे आहेच. एखाद्या कंपनीने जाहिरातीचा डेमो मागितला तर ती त्यावर मेहनत करून स्वतःचे पैसे वापरून ती जाहिरात शूट करून त्यांना पाठवते. मितालीसाठी मी आनंदी आहे म्हणण्यापेक्षा मला तिचा जास्त अभिमान वाटत आहे. हे स्वतःच स्वतः घडवणं अवघड आहे. हे टॅलेंट माझ्यामध्ये नाही हे मी स्वीकारतो”.
ट्रोलर्सच्या यावर येणाऱ्या कमेंटवरून बोलताना सिद्धार्थ म्हणाला, “मी अजिबात ट्रोलर्सवर चिडणार नाही, कारण हे कसं करतात हे त्यांना माहित नाही. अर्थात मालिका, चित्रपट काहीच हातात नसताना कसे फिरू शकतात हा प्रश्न मलाही पडला असता. पण मी तिचा नवरा आहे त्यामुळे मला हे माहित आहे. परदेशातील क्लाईंट असतील तर पहाटे चार वाजेपर्यंत त्यांच्या वेळेत बोलावं लागतं. त्याच्या मागे लागून, त्यांचा फॉलोअप घेऊन ते काम मिळवणं सोप्प नाही. आणि या कामाची मेहनत दिसून न येता या कामाची मज्जा जास्त दिसून येते. एका वर्षात मितालीने ७ वेगवेगळे देश पाहिले आहेत आणि हे करण्यासाठी कौशल्य हे असावंच लागतं. यातील युरोप ट्रिप ही मिताली व मी पैसे साठवून केली आहे, पण यापुढच्या सर्व ट्रिप तिने तिच्या बुद्धी कौशल्याने केल्या आहेत”.
ट्रोलर्सबाबत मिताली असंही म्हणाली की, “मी प्रचंड फटकळ आहे. एक अभिनेत्री म्हणून प्रेम मिळतं या अनुषंगाने आम्ही प्रेक्षकांबरोबर पोस्ट शेअर करत असतो. त्यामुळे जेव्हा ट्रोलिंगचा मुद्दा समोर येतो तेव्हा आम्हाला ही वाईट वाटतं”.