सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार मंडळी चाहत्यांशी अधिकाधिक संवाद साधतात. विविध फोटो व व्हिडीओही कलाकार सातत्याने शेअर करतात. जगभरातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया प्रभावी माध्यम झालं आहे. पण याचे काही तोटेही आहेत. कलाकारांनी एखादा फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट केला की, कित्येकजण त्यावर आपली मतं मांडताना दिसतात. बऱ्याच प्रमाणामध्ये टीका होते. ट्रोलिंगचा अधिकाधिक सामना कलाकारांना करावा लागतो. सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री मिताली मयेकरलाही याचा बराच अनुभव आला आहे. बिकिनी परिधान केल्यानंतर ट्रोल करणाऱ्यांना तिने सडेतोड उत्तर दिलं आहे.
काही दिवसांपूर्वी मितालीने बीचवरील फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये तिने बिकिनी परिधान केली असल्याचं दिसलं. मितालीने फोटो शेअर केल्यानंतर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. “हिच का मराठी संस्कृती” म्हणत नेटकऱ्यांनी तिला सुनावलं. आता ट्रोल करणाऱ्यांना तिने सडेतोड उत्तर दिलं आहे. बीचवर साडी परिधान केलेला एका व्हिडीओ मितालीने शेअर केला.
साडी परिधान केलेला व्हिडीओ शेअर करत तिने म्हटलं की, “मी कोणतेही कपडे परिधान केले तरी माझी मुळं मी कधीच विसरणार नाही. अभिमान आहे मला मी मराठी असल्याचा आणि माझ्या मराठी संस्कृतीचा”. मितालीच्या या व्हिडीओवरही अनेक कमेंट करत तिला सुनावलं पण या सगळ्यांना तिने उत्तर दिलं आहे. “आधी नागडेपणा आणि नंतर संस्कृतीचा अपमान, व्हा” असं एका युजरने कमेंट केली. कमेंटमध्ये या युजरने संस्कृती शब्द चुकीचा लिहिला. यावर मिताली म्हणाली, “दादा तुम्हाला संस्कृती म्हणायचं होतं का? ओके”.
“मराठी संस्कृती तुमच्या बुद्धीच्या आकलनाच्या पलिकडे आहे. असे प्रयत्न करु नका. बिकिनी घाल किंवा नको घालू हा मुद्दाच नाही. तुझ्या नवऱ्याला चालत असेल तर कुणी दुसऱ्याने बोलायची गरज नाही. पण कोणी काम द्यावं या आशेने अंगप्रदर्शन करणाऱ्या मराठी अभिनेत्रींची कमी नाही” अशी दुसऱ्या एका युजरने कमेंट केली. ही कमेंट पाहून मिताली संतापली. म्हणाली, “संस्कृती व काम कसं आत्मसात करायचं याचे क्लासेस तुम्ही घेता का काकू? प्लीज घ्या. अशा क्लासेसला मला यायला आवडेल”. मितालीने ट्रोल करणाऱ्यांची बोलती बंद केली आहे.