मराठी चित्रपटसृष्टीत सध्या बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यातील एक चित्रपट म्हणजे ‘आत्मपॅम्फ्लेट’. आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित हा चित्रपट शालेय जीवन, वयात येणारा मुलगा, प्रेम आणि त्यानंतर दोन मुलांमधील स्पर्धा या व अशा विविध विषयांभोवती फिरताना दिसतो. हा चित्रपट अत्यंत अतरंगी व तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा असा आहे. अशा या दर्जेदार चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप कमी प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नुकताच हा चित्रपट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी पाहिला. त्यानंतर त्यांनी चित्रपटगृहातील एक व्हिडिओ ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. (amey khopkar angry after watch aatmapamphlet movie)
अमेय खोपकर चित्रपट पाहायाला गेले असताना त्यांनी चित्रपटगृहातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत संपूर्ण चित्रपटगृह रिकामी असलेलं पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी ट्विटमध्ये लिहीलं, ‘‘आत्मपॅम्फ्लेट’ हा मराठी चित्रपट आज बघितला. अतिशय उत्तम सिनेमा आहे, जो भरपूर हसवतो आणि तितकाच विचारही करायला लावतो. हा चित्रपट फक्त मराठीच नाही तर देशभरातील सर्व प्रेक्षकांनी पाहायला हवा असा आहे. दुर्दैवाने, आज जेव्हा मी चित्रपट बघितला तेव्हा आम्ही फक्त पाचजणं सिनेमाहॉलमध्ये होतो. मराठीतले दर्दी रसिक गेले कुठे? एका उत्कृष्ट कलाकृतीला प्रेक्षक मिळत नसतील तर नेमकं काय चुकतंय आणि हे असं का होतंय, याचा आता निर्माते आणि प्रेक्षक, सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे’, असं लिहित त्यांनी खंत व्यक्त केली आहे.
आत्मपॅम्फ्लेट हा मराठी चित्रपट आज बघितला. अतिशय उत्तम सिनेमा आहे, जो भरपूर हसवणूक करतो आणि तितकाच विचार करायलाही लावतो. हा चित्रपट फक्त मराठीच नाही तर देशभरातील सर्व प्रेक्षकांनी पहायला हवा असा झालेला आहे.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) October 6, 2023
दुर्दैवाने, आज जेव्हा मी चित्रपट बघितला तेव्हा आम्ही फक्त पाचजण… pic.twitter.com/XL2LR3BrsB
अमेय खोपकर पुढे लिहीतात, ‘भविष्यात यासाठी पुढाकार घेऊन जे जे करावं लागेल ते आम्ही करणारच. पण सध्यातरी माझं सर्वांना आवाहन आहे की ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा चित्रपट आवर्जून बघा. असे चांगले चित्रपट मराठीत फार कमी बनतात, जर आता त्यांना आपण प्रतिसाद दिला नाही तर दिवसेंदिवस मराठीची अवस्था आणखी बिकट होत जाईल’, असं लिहीत त्यांनी मराठी चित्रपटाच्या प्रेक्षकांबद्दल संताप व्यक्त केला आहे.
हा चित्रपट ६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन आशिष अविनाश बेंडे यांनी केलं आहे. या चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजळी श्रीकांत, भीमराव मुडे व केतकी सराफ हे प्रमुख भूमिकेत आहेत. तसेच या चित्रपटाचे लेखन परेश मोकाशी यांनी केले आहेत. परेश यांना राष्ट्रीय पुरस्कार ही मिळाला आहे.