मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून क्रांती रेडकरचं नाव आवर्जून घेतलं जातं. आजवर तिने अनेक मालिका व चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सध्या अभिनयापासून दूर असली तरीही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक प्रसंग ती चाहत्याबरोबर शेअर करत असते. तसेच समाजातील अनेक विषयांवरही ती आपले परखड मत मांडत असते. क्रांतीला दोन जुळ्या मुली आहेत. त्यांच्याबरोबरचेही अनेक व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या सर्व व्हिडीओंना चाहत्यांची खूप पसंती मिळते. अशातच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. (kranti redkar on sister)
क्रांती इन्स्टाग्रामवर नेहमी व्हिडीओ पोस्ट करत असते. आपल्या घरातील, आजूबाजूचे अनेक प्रसंग, तसेच मुलींच्या गमती-जमती ती चाहत्यांना सांगत असते. अशातच आता तिने आता बहिणीबद्दलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती आईच्या हट्टीपणाबद्दल बोलताना दिसत आहे. यामध्ये ती म्हणाली की, “आपल्या प्रत्येकाच्या घरात एक जबाबदार व्यक्ती असते. तसेच असे एखादे घर असतेच जिथे आपले आई-वडील आपलं ऐकत नाहीत पण दुसऱ्या व्यक्तीचं ऐकतात. आमच्या घरी मी माझ्या आईला कितीही काहीही सांगितलं तरीही ते ऐकत नाहीत.पण ताईने तीच गोष्ट जर आईला सांगितली तर आई मात्र लगेच ऐकते. आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर, माझ्या आईच्या बेडरुममधला एसी खराब झाला होता. माझ्या आईने मला लगेच फोन करुन सांगितला म्हणाली मुन्ना रुममधला एसी खराब झाला आहे. त्या ‘व्हलपूल’वाल्या माणसाला फोन कर आणि काम करण्यासाठी बोलावून घे. त्यावर मी तिला म्हणाले की दुरुस्त करण्यापेक्षा नवीन घेऊया. त्यावर आई मला म्हणाली की तुला काही कळत नाही. मला काही शिकवू नकोस. मी ठीक आहे म्हणाले आणि दुरुस्त करण्यासाठी बोलवते असं सांगितलं”.
त्यानंतर थोड्या वेळात पुन्हा आईचा फोन आला आणि म्हणाली की आपण नवीन एसी घेऊया. मी ताईबरोबर बोलले आणि ती म्हणाली नवीन एसी घेऊया. मी देखील हेच सांगितलं होतं. मात्र तिने ताईचं शांतपणे सांगितलेलं सगळं ऐकलं”. तसेच तिने चाहत्यांनाही विचारलं की, “तुमच्या घरात अशी एखादी व्यक्ती आहे का?” , क्रांतीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत तसेच पसंतीदेखील दर्शवली आहे.
क्रांतीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, सध्या क्रांती अभिनय, नृत्याबरोबरच दिग्दर्शन क्षेत्रातही आपली एक वेगळी जागा निर्माण करत आहे. तिने दिग्दर्शित केलेला ‘रेनबो’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी तिने ‘काकण’ या चित्रपटाचे दिग्दर्शक केले आहे.