अभिनेत्री क्रांती रेडकर ही सोशल मीडियावर अधिक सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. ती तिच्या दैनंदिन जीवनातल्या अनेक घडामोडी सोशल मीडियाद्वारे मजेशीर अंदाजात चाहत्यांबरोबर शेअर करत असते. तिच्या जुळ्या मुलींचे व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावरून शेअर करत असते. तसेच पती समीर वानखेडे व त्यांच्या कामाबद्दल माहिती देणारे अनेक फोटो-व्हिडिओदेखील ती शेअर करत असते. आज समीर यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त त्यांनी एका खास ठिकाणी हजेरी लावत त्यांचा वाढदिवस साजरा केला आहे. (Kranti Redkar On Instagram)
क्रांतीने नुकताच इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. या व्हिडीओमध्ये क्रांती-समीर यांनी गरजू मुलांबरोबर समीर यांचा वाढदिवस साजरा केला आहे. क्रांती-समीर यांनी गरजू मुलांना भेटवस्तू देत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो आनंद त्या लहान मुलांच्या चेहऱ्यावरदेखील दिसत आहे. दरम्यान, या भेटीचे काही खास क्षण क्रांतीने व्हिडीओद्वारे चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
या व्हिडीओमध्ये समीर गाडीतून उतरताच क्रांतीच्या आईच्या पाया पडत आहे आणि त्यांचे आशीर्वाद घेत आहेत. तसेच पुढे ते त्यांची विचारपूस करत त्यांच्याशी गप्पादेखील मारत आहेत. यानंतर ते एका ठिकाणी गरजू मुलांना भेट द्यायला गेले असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. तिथे त्या लहान मुलांबरोबर ते संवाद साधतात. यावेळी ते त्यांना खाऊ, चॉकलेट व ब्लँकेट या भेटवस्तूही देतात. “प्रेमाने भरलेले हृदय हे देवाच्या सर्वात जवळ असण्याइतके चांगले आहे. समीरचा वाढदिवस या चिमुकल्या मुलांबरोबर साजरा केला याचा आनंद आहे” असं म्हणत क्रांतीने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
दरम्यान, क्रांतीने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. या व्हिडीओखाली अनेकांनी समीर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत. त्याचबरोबर समीर-क्रांतीच्या या समाजभान जपणाऱ्या अनोख्या कृतीमुळे नेटकऱ्यांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.