मराठी मनोरंजनसृष्टीत आपल्या मनमोहक सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालणाऱ्या एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. अनेक मराठी नाटक, मालिका व चित्रपटांमधून काम करत त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मराठीसह हिंदी चित्रपटांतही त्यांनी काम केले आहे. ‘शाब्बास सूनबाई’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धडाकेबाज’, ‘वजीर’ ‘हळद रुसली कुंकू हसलं’, ‘ध्यानीमणी’ सारख्या अनेक मराठी व ‘जखमी दिल’, ‘मोहब्बत की आरजू’, ‘बंधन’ सारख्या अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांत काम करत त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. (Ashvini Bhave On Instagram)
अश्विनी या सध्या मनोरंजनसृष्टीपासून लांब असल्या तरी त्या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. सोशल मीडियावर आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत ते त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. अशातच अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने तिच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. अश्विनी या काल (१३ डिसेंबर) बांद्राला भजीपाव खाण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा यानिमित्ताने त्यांनी त्यांची जुनी आठवण शेअर केली आहे. अश्विनी बांद्रामध्ये त्यांच्या वडापाव-भजीपाव खायला गेली असताना त्यांना मोह आवरला नाही. त्यामुळे ही खास आठवण त्यांनी कॅमेऱ्यात कैद केली.
ही खास आठवण त्यांनी व्हिडीओद्वारे त्यांच्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, “कधीकधी आपल्या जुन्या ठिकाणी भेट द्यायला खूप मज्जा येते. तशीच मी आता ‘पाटील वडापांव-भजीपाव’ इथे आली आहे. वांद्रेमध्ये माझ्या आवडीच्या खाण्याच्या खूप जागा आहेत. वांद्रेमधील कुल्फीवाला, शेवपुरीवाला आणि हा ‘पाटीलचा वडापाव’ या माझ्या आवडीच्या जागा आहेत. माझे मन झाले की मी याठिकाणी येऊन या पदार्थांचा आस्वाद घेते. माझ्या मुलांनाही इथला वडापाव आवडतो. त्यांना तिखट लागलं तरी ते आनंदाने हा वडापाव खातात आणि तेच मीसुद्धा करत आहे.”
आणखी वाचा – “त्यांना असं रडताना पाहून…”, रवींद्र बेर्डेंच्या निधनानंतर हेमांगी कवी भावुक, म्हणाली, “जो नट इतकी वर्षे…”
यापुढे त्यांनी “वांद्रेमधील तुमच्या आवडीची खाण्याची ठिकाणे कोणती आहेत? ते मला सांगा. मला त्याठिकाणी भेटी देऊन त्या पदार्थांचा आस्वाद घ्यायला नक्की आवडेल” असंही चाहत्यांना म्हटलं आहे. तसेच या व्हिडीओत त्या भजीपावचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत. दरम्यान, अश्विनी भावे या सध्या मनोरंजनसृष्टीत कार्यरत नाहीत पण त्या सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात राहतात. नुकतेच त्यांनी स्टायलिश लूकमधील काही फोटो शेअर केले असून या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे भरघोस प्रतिसाद दिला आहे. तसेच त्यांच्या या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.