अभिनेत्री खुशबू तावडे हिने बरीच वर्षे हिंदी सिनेसृष्टीत काम केल्यानंतर अचानक मराठी सिनेविश्वाकडे पावलं वळविली. बऱ्याच वर्षांनी खुशबूने मराठी सिनेसृष्टीत पाऊल टाकत ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेतून छोटा पडदा गाजवला. मनासारखी भूमिका आजवर न मिळाल्याने खुशबू बराच काळ मालिकाविश्वापासून दूर होती. मात्र अनुभवातून बरेच धडे घेत तिने पुन्हा एकदा कमबॅक केलं. सारं काही तिच्यासाठी या मालिकेत उमा हे पात्र साकारताना दिसत आहे. (Khushboo Tawde Exit)
खुशबूच्या उमा या पत्राने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. एक आई, एक बायको, एक सून, एक सासू, एक मावशी अशी विविध नाती जपत उमा या पात्राने मालिकेच्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आता प्रेक्षकांची ही लाडकी उमा म्हणजेच खुशबू तावडे मालिकेतून एक्झिट घेणार आहे. मालिकेत खुशबू तावडेच्या जागी आता अभिनेत्री पल्लवी वैद्य उमा हे पात्र साकारताना दिसणार आहे. खुशबू ही मालिका सोडणार असल्याचे कारणही समोर आले आहे.
खुशबू तावडे ही गरोदरपणामुळे मालिकेचा निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे. खुशबू दुसऱ्यांदा गरोदर आहे. खुशबूला एक मुलगा असून त्याचे नाव राघव असे आहे. आता दुसऱ्यांदा खुशबु गरोदर आहे. गरोदरपणात आठ महिने खुशबूने शूटिंग केलं आहे. मात्र आता तिला आरामाची गरज असल्याने तिने ब्रेक घेतला असल्याचं सांगितलं आहे. अभिनेत्रीने याबाबत नुकतीच ‘इट्स मज्जा’ला मुलाखत दिली. यावेळी बोलताना खुशबूने तिच्या गरोदरपणाबाबत भाष्य केलं.
यावेळी बोलताना खुशबू म्हणाली, “निरोप घेतानाही आज माझ्या चेहऱ्यावर आनंद आहे. पण माझ्या मनात मिश्र भावना आहेत. कारण माझ्याकडे खूप गोड बातमी आहे. मी माझ्या बाळाच्या येण्याची वाट पाहत आहे. मी दुसऱ्यांदा गरोदर असून आता आठवा महिना सुरु आहे. गेले आठ महिने मी मालिकेच्या सेटवर सुरळीतपणे काम केलं आहे. उमा आई म्हणून सर्वांनी प्रचंड प्रेम केलं. पण माझ्या खऱ्या आयुष्यात हा आनंद दुप्पट होत आहे. गरोदरपणामुळे मी आता मालिकेचा निरोप घेत आहे”.