नुकताच प्रदर्शित झालेला ‘झिम्मा २’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे. सामान्य प्रेक्षकांबरोबर मराठीतील अनेक कलाकार या चित्रपटावर त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. अशातच अभिनेत्री हेमांगी कवीने सुद्धा या चित्रपटाचे कौतुक करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. हेमांगी ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती अनेक विषयांवर आपली मतं मांडत असते. अशातच तिने ‘झिम्मा २’ मधील कलाकारांचे कौतुक करत एक पोस्ट लिहिली आहे.
या पोस्टमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “हेमंत ढोमे, अरे काय कमाल सिनेमा आहे! खरंच सांगायचं झालं तर ‘झिम्मा १’ पेक्षा ‘झिम्मा २’ जास्त जमून आला आहे. कदाचित या बायकांना आम्ही ‘झिम्मा १’ पासून ओळखत होतो. म्हणून हे मला वाटलं असेल. प्रत्येकीची गोष्ट वेगळी असली तरी तितकीच प्रभावी व प्रत्येकाशी संबंधित आहे. या चित्रपटातील प्रत्येक गोष्ट विचार करायला लावणारी व आचरणात आणायला लावणारी आहे. मला हा चित्रपट प्रचंड आवडला.”
यापुढे तिने निमिती सावंत यांचे कौतुक करत असे म्हटले आहे की, “आपल्याकडे विशिष्ट वयानंतर अभिनेत्रीला मुख्य किंवा हिरोईन म्हणून बघितलं जात नाही. पटकन चरित्र कलाकार, सहाय्यक कलाकार म्हणून त्यांना साचेबद्ध करतो. हॉलीवूड किंवा इतर कुठेही असं होत नाही. मोठ्या वयाच्या अभिनेत्रींना मुख्य अभिनेत्री म्हणूनच पाहीलं जातं. पुरस्कारासाठी मुख्य कॅटेगरीमध्ये गणलं जातं. ही गोष्ट जर आपल्या इथं सुरू झाली तर त्याला तुम्ही कारणीभूत असशील.”
यापुढे सुहास जोशी यांचे कौतुक करत “तुझ्या त्या लाइन मारण्याच्या सीनला मी तर शिट्टीच वाजवली. यापुढे तिने रिंकूला “तू खुप समजून-उमजून काम केलं आहेस. रोजच्या पठडीतील सून न करता एकदम छान तान्या साकारली आहेस. तुला स्क्रीनवर पाहून आपसूक आमच्या चेहऱ्यावर गोड हसू येत होतं.” तसेच यापुढे तिने हेमंत व झिम्माच्या टीमकडे चित्रपटाचे आणखी काही भाग यावेत अशी मागणी करत म्हटले आहे की, “आता आम्हांला ‘झिम्मा’चा तिसरा भागदेखील हवा आहे. ते तू बाकी चित्रपट करत रहा. फार फार तर काय होईल, एखादा भाग फसेल! ठिक आहे की. पण हा खेळ थांबवू नकोस एवढीच विनंती”
आणखी वाचा – अखेर रणदीप हुड्डा व लीन लैश्राम यांचा विवाहसोहळा संपन्न, लक्षवेधी पोशाख, पारंपरिक विधीने वेधले लक्ष
दरम्यान, हेमांगीने शेअर केलेल्या या पोस्टला अनेकांनी लाईक्स् व कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. या पोस्टखाली अनेक चाहत्यांनी तिच्या या पोस्टचे कौतुक् केले आहे. त्याचबरोबर झिम्मा २ या चित्रपटाचेदेखील कौतुक केले आहे.