‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. या शोमधून अनेक कलाकारांना लोकप्रियता मिळाली. त्याचबरोबर अनेक कलाकार प्रसिद्धीझोतातही आले. त्यापैकीच एक कलाकार म्हणजे अभिनेता गौरव मोरे. ‘फिल्टर पाड्याचा बच्चन’ असं म्हणत गौरव मोरेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून विनोदी स्किट्स करणारा गौरव मोरे आता चित्रपटातूनदेखील प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. (Gaurav More’s Interview Of London Misal)
अशातच आता त्याचा नवीन चित्रपट येत असून सध्या सोशल मीडियावर याच चित्रपटाची चर्चा सुरू आहे. ‘लंडन मिसळ’ असं या चित्रपटाचं नाव आहे. येत्या ०८ तारखेपासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. याच चित्रपटासाठी तो सध्या जोरदार प्रमोशन करत आहे. दरम्यान या चित्रपटाचे बहुतांश शूटिंग हे लंडनमध्ये झाले आहे. तेव्हा लंडनमध्ये शूटिंगदरम्यान काही किस्से झाले होते. यावेळी चित्रपटाच्या प्रमोशननिमित्ताने ‘इटस मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने लंडनमधील एक किस्सा शेअर केला आहे.
यावेळी त्याला “तू लंडनमध्ये फिरत असताना कुठे रस्ता चुकला होतास का?” असा प्रश्न विचारण्यात आला. याचं उत्तर देताना त्याने लंडनमध्ये फिरतानाचा एक किस्सा चाहत्यांबरोबर शेअर केला. हा किस्सा सांगताना तो असं म्हणाला की, “या चित्रपटाच्या शूटिंगला मी अभिनेता निखिल चव्हाण माझ्याबरोबर असेल तरच बाहेर पडायचो किंवा मी माझ्या कोणत्यातरी मित्राला कॉल करुन त्याच्याशी फोनवर बोलतचं बाहेर जायचो. याचं कारण माझी इंग्रजी.” गौरवला इंग्रजी भाषा नीट बोलता येत नसल्यामुळे मी कुणी बरोबर असेल तरच बाहेर जायचो असं गंमतीत म्हणाला आहे.
दरम्यान, ‘लंडन मिसळ’ या चित्रपटात गौरव मोरेची महत्त्वाची भूमिका असल्याचे म्हटले जात आहे. तसेच ऋतुजा बागवे, रितिका श्रोत्री, माधुरी पवार, निखील चव्हाण, ऋतुराज शिंदे आदि कलाकारदेखील या चित्रपटात आहेत. तर अभिनेते भरत जाधव एका हटके भूमिकेत प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करताना दिसणार आहेत. त्यामुळे चाहते या चित्रपटासाठी तसेच गौरव मोरेची या चित्रपटातील अनोखी भूमिका पाहण्यासाठी आतुर आहेत.