सध्या मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत लग्नसराईचा मौसम सुरू आहे. गेल्या काही दिवसांत मराठीतील अनेक कलाकारांनी आपल्या जीवनसासाथीबरोबर लग्नगाठ बांधली. अशातच आता प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाने गर्लफ्रेंड लीन लैश्रामबरोबर लग्नगाठ बांधली आहे. त्यांनी एकमेकांच्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर हे दोघे लग्न कधी करणार असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला होता. यामुळे गेले काही दिवस त्यांच्या लग्नाच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगत होत्या. अशातच काल (२९ नोव्हेंबर) रोजी दोघे मणिपूरमध्ये पारंपरिक पद्धतीने विवाहबद्ध झाले. (Randep Hooda And Lin Laishram Marriage)
नुकतीच त्यांनी त्यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर केली होती. यात त्यांनी लग्नाची तारीख जाहीर करत सर्वांच्या प्रेम व आशीर्वादासाठी धन्यवाददेखील म्हटले होते. जवळचे काही नातेवाईक, कुटुंबीय व मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत रणदीप-लीन यांचा विवाहसोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडला. त्यांच्या या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमधून त्यांच्या लग्नाची काही खास क्षण चाहत्यांना पाहायला मिळाली आहेत.
फोटो व व्हिडीओमध्ये रणदीप-लीन यांनी मणिपूरमधील पारंपरिक पद्धतीचा पोशाख परिधान केल्याचे दिसत आहे. ज्याप्रमाणे महाभारतात अर्जुनने राजकुमारी चित्रांगदाबरोबर ज्या ठिकाणी विवाह केला होता. त्याच ठिकाणी रणदीपनेही लीनबरोबर सात फेरे घेतले आहेत. रणदीप-लीनच्या वयात जवळपास १० वर्षांचा फरक आहे. रणदीप हा ४७ वर्षांचा असून लिन ही ३७ वर्षांची आहे.
दरम्यान रणदीप-लीन यांनी त्यांच्या लग्नाचे हे खास फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. या फोटोखाली त्याने ‘आजपासून आम्ही एकत्र’ असं म्हटलं आहे. त्याचबरोबर ‘जस्ट मॅरीड’ असा हॅशटॅगदेखील दिला आहे. त्यांच्या या फोटोखाली चाहत्यांनी कमेंट्स करत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्याचबरोबर मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनीदेखील कमेंट्सद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.