‘फॅंड्री’, ‘सैराट’, ‘न्युड’, ‘रेडू’, ‘सरला एक कोटी’ अशा गाजलेल्या मराठी चित्रपटांसह ‘झुंड’ व ‘गंगूबाई काठियावाडी’ अशा बॉलीवूड चित्रपटांत अभिनय करत आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या अभिनेत्री म्हणजे छाया कदम. विविधारंगी व्यक्तिरेखा आणि त्यातला सशक्त अभिनय यामुळे कोणत्याही भूमिकेत त्या अगदी चोख बसतात आणि छाया कदम ती भूमिका अगदी चोखपणे निभावतातदेखील. अनेक हिंदी मराठी चित्रपटांतून छाया कदम यांनी त्यांच्या सकस अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. अलीकडेच त्यांची भूमिका असलेला चित्रपट कान चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट ठरला होता. याबद्दल त्यांचं सर्वत्र प्रचंड कौतुक करण्यात आलं. छाया यांच्या उत्तम कामगिरीमुळे त्या सर्वांच्या कौतुकाच्या मानकरी ठरल्या.
अशातच आता हेमांगी कवीने छाया कदम यांच्याबद्दल कौतुकास्पद पोस्ट शेअर केली आहे. हेमांगीने एक भलीमोठी पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “‘कान्स’ला जायच्या आधीच्या आणि आता येणाऱ्या प्रत्येक यशासाठी तुझं खूप खूप कौतुक आणि अगणित शुभेच्छा. छायडे. तू तिथे जायच्या आधीही भारीच होतीस गं. मराठीतली तुझी सर्व कामं, हिंदीत ‘झुंड’, ‘अंधाधुंद’, ‘गंगूबाई काठीयावाडी’, आताचा ‘लापता लेडीज’, ‘मडगाव एक्सप्रेस’ किती तरी सुंदर सुंदर कामं केलीस. पण तुझं भारीपण आपल्या मराठी मीडियाच्या लक्षात यायला फार उशीर झाला असं मला वाटतं. त्यासाठी तुला परदेशी जाऊन यावं लागलं”.
यापुढे हेमांगीने असं म्हटलं आहे की, “‘देर आए दुरूस्त आए’ म्हणायचं. लोकांनीही तुझं कौतुक केलं, ते तुझ्याबद्दल आणखी आणखी वाचत होते कारण लोकांना वाचायला, तुला बघायला मज्जा येत होती. त्यामुळे यानिमित्ताने मला सर्व मीडियाला विनंती करावीशी वाटते की कुठल्या अभिनेत्रीने किती लग्नं केली?, कुणाबरोबर फिरत आहे?, काय कपडे घातले आहेत?, मुल का नाही? असल्या फालतू आणि लोकांना कंटाळवाण्या वाटणाऱ्या बातम्यांपेक्षा तिच्या कामाबद्दल माहीती दिली, जमलं तर प्रसंशा केली तर बरं होईल आणि तुम्हाला सोशल मीडिया उत्तम प्रतिसादही मिळेल. जे तुम्ही छायाच्या वेळी मिळवलीत”.
यापुढे हेमांगीने असं म्हटलं आहे की, “एक असा काळ होता जेव्हा मालिकावाले तुला शूटिंगसाठी स्वतःचे कपडे आणत जा सांगायचे आणि आज, जगभरातले मोठमोठे डिझायनर्स तुला त्यांचे कपडे देऊ करत आहेत. क्या बात है. तुझ्या अभिनयाच्या यशाबरोबरच या यशाचं कौतुक वाटतं. कारण आपल्याला माहीती आहे गं ‘स्वतःचे कपडे आणा’ सांगितल्यावर काय वाटायचं. बाकी तु कमाल होतीस, कमाल आहेस आणि कमाल रहा. आमचं तुझ्यावर प्रेम आहे”.