पाऊस आणि पाऊसामुळे पडणारे खड्डे हे समीकरण काय आता नवीन राहिलेलं नाही. पहिल्याच पावसात मुंबईसह इतर शहारातील रस्त्यांची चाळण होते. मागील काही दिवसांपासून मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे मुंबईतील अनेक रस्त्यांवर खड्डे पडल्याचे पाहायला मिळत आहेत. मुंबईतील शहरांसह महामार्गांवरदेखील खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. दुचाकीचालक, प्रवाशांना याचा खड्ड्यांना मोठा फटका बसत आहे. या महामार्गांवर लाखो रुपयाची टोल वसुली केली जाते, मात्र तरीही महामार्गाच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे. महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांबद्दल प्रसिद्ध गायक मंगेश बोरगावकरने संताप व्यक्त केला आहे.
‘सारेगमप’मधून उदयास आलेला युवा गायक मंगेश बोरगावकर हा त्याच्या सुमधुर आवाजामुळे चर्चेत असतो. त्याने चित्रपट गीते किंवा अल्बममध्ये गाणी गायलं असून तो अनेक गाण्यांचे कार्यक्रमहे करतो. आपल्या सुमधुर आवाजाने चर्चेत राहणारा मंगेश सोशल मीडियावरही चांगलाच सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. त्याचबरोबर तो त्याच्या गाण्याचे व कार्यक्रमांचेही व्हिडीओ शेअर करत असतो. अशातच त्याने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.
मंगेशने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामधून त्याने रस्त्यावरील खड्ड्यांची परिस्थिती दाखवली आहे. मंगेशने महामार्गाचा एक व्हिडीओ शेअर केला, ज्या महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य असलेलं पाहायला मिळत आहे. अनेक मोठमोठ्या खड्ड्यांमधून प्रवासी आपली वाट काढत आहेत. हाच व्हिडीओ शेअर करत मंगेशने संताप व्यक्त केला आहे.
“हे आपले महामार्ग, आपण फक्त टॅक्स (कर) भरत राहायचं बस्स” असं म्हणत मंगेशने महामार्गावरील खड्ड्यांबाबत संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, सततच्या मुसळधार पावसामुळे रस्त्याची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर प्रचंड मोठे खड्डे पडले असून प्रवाशांसह अनेक नागरिकांना आपला जीव मुठीत धरून या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे.