बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या दरम्यान भाजपा आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचे नाव घेत केलेल्या वक्तव्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री प्राजक्ता माळीने मुंबईत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच, सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचारही घेतला. ‘आपपासांतील राजकारणासाठी महिला कलाकारांच्या नावाचा गैरवापर होता कामा नये’, अशा शब्दांत प्राजक्ता माळीने आपली भूमिका स्पष्ट केली. तसंच सुरेश धस यांनी आपली जाहीर माफी मागावी, अशी मागणीदेखील केली आहे. (deepali sayed on prajakta mali)
प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर कलाकार विश्वातून तिला अनेकांचा प्रतिसाद मिळत आहे. अभिनेता कुशल बद्रिके, अभिनेत्री विशाखा सुभेदार, लेखक-दिग्दर्शक सचिन गोस्वामी, तसंच निर्माते नितीन वैद्य यांनी प्राजक्तासाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जाहीर पाठिंबा दिला. प्राजक्ता माळीने केलेल्या वक्तव्यांवर आता संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत. अशातच आता अभिनेत्री दीपाली सय्यद यांनीही प्राजक्ता माळी प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना दीपाली यांनी त्यांची भूमिका व्यक्त केली.
यावेळी त्या असं म्हणाल्या, “महिला म्हणून आवाज उठवण्यापेक्षा मी प्राजक्ता माळीलाच हा प्रश्न विचारत आहे की, प्राजक्ताने त्याच वेळी प्रकट व्हायला पाहिजे होतं, जेव्हा करुणा मुंडे रडून रडून सांगत होत्या. जर ते चुकीचे होतं ना तर प्राजक्ताने तेव्हाच म्हटलं पाहिजे होतं की, तुम्ही माझं नाव का घेत आहात? जर माझ्या या स्त्रीत्वाला कुठे तरी लांछन लागत आहे, तिथे प्राजक्ताने व्यक्त व्हायलाच पाहिजे होतं. तेव्हा ती व्यक्त नाही झाली आणि आता होत आहे तर तो विषय तेव्हापासून चालत आलेला विषय धरुन पुढे आणलेला विषय आहे. जर तो विषय तिथेच संपला असता तर आज राजकरणाऱ्यांनी तो विषय घेतलाच नसता”.
दरम्यान, प्राजक्ताच्या पत्रकार परिषदेनंतर अनेक मराठी कलाकार तिला पाठिंबा देत आहेत. कलाकारांना अशा प्रकारे लक्ष्य करणं चुकीचं आहे, असं मत ते मांडत आहेत. राज्यातील प्रसारमाध्यमं आणि राजकीय नेते यांचा विकृतीकडे प्रवास चालू झाला आहे. महाराष्ट्राने प्राजक्ता माळीबरोबर ठामपणे उभे राहिले पाहिजे. मला क्षेत्र किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रातील बदनामी ही पुरुषप्रधान मनोवृत्तीचाच एक भाग आहे, असे म्हणत अनेकांनी प्राजक्ता माळीला त्यांचा पाठिंबा दर्शवला आहे.