गेल्या काही दिवसांत मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी आपल्या जोडीदाराबरोबर लग्नगाठ बांधली. तर काहींनी आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली. अशातच आता आणखी एका मराठी अभिनेत्याने त्याच्या प्रेमाची कबुली दिली आहे आणि हा अभिनेता म्हणजे फ्रेशर्स मालिकेतन घराघरात पोहोचलेला सिद्धार्थ खिरीड. अभिनेता सिद्धार्थ खिरीडने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्याच्या प्रेमाची कबुली दिली आहे. २०२४ या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाच्या आगमन करताना सिद्धार्थने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. (Siddharth Khirid confessed love)
सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गर्लफ्रेंडसह रोमँटिक फोटो शेअर केले आहेत आणि या दोघांच्या मागे हृदयाच्या आकारामध्ये सुंदर असं फुलांचं डेकोरेशन केल्याचं पाहायला मिळत आहे. या रोमँटिक फोटोंना कॅप्शन देत सिद्धार्थने असं म्हटलं आहे की, “फक्त २०२४ हे वर्ष संपत नाही तर, माझ्या आयुष्यातील ‘सिंगल’ अध्याय सुद्धा आता संपलेला आहे” त्याचबरोबर त्याने पुढे ‘EndingSingleEra’ असा हॅशटॅगसुद्धा वापरला आहे.
सिद्धार्थने प्रेमाची कबुली देत आपल्या गर्लफ्रेंडचा पाठमोरा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिचा चेहरा स्पष्ट दिसत नाहीये. त्यामुळे सिद्धार्थची ही जोडीदार नेमकी कोण आहे? याबद्दल चाहत्यांना प्रश्न पडला आहे. त्यामुळे सिद्धार्थच्या या फोटोखाली कमेंट्समध्ये अनेकांनी त्याला ही मुलगी नक्की कोण आहे अशी विचारणा केली आहे. त्याचबरोबर अनेकांनी सिद्धार्थला अभिनंदन व शुभेच्छादेखील दिल्या आहेत. तसंच मधुरा जोशी, चेतना भट, रसिका वेंगुर्लेकर, अमृता देशमुख, रश्मी अनपट या कलाकारांनीही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, अभिनेता सिद्धार्थ खिरीड त्याच्या आयुष्याच्या एका नवीन प्रवासाला सुरुवात करत आहे. सिद्धार्थने आजवर अनेक मालिका व चित्रपटांत काम केले आहे. यामध्ये मुलगी झाली हो’, ‘फ्रेशर्स’, ‘जाऊबाई जोरात’, ‘हृदयी प्रीत जागते’ अशा लोकप्रिय मालिकांचा समावेश आहे. याशिवाय काही चित्रपटांमध्येदेखील सिद्धार्थने काम केलेलं आहे.