वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नये किंवा त्याचा वापर करु नये हा वाहतुकीचा नियम आहे. पण अलीकडे हा नियम अनेक वाहन चलकांकडून मोडण्यात येत असल्याचे पाहायला मिळतं. अलीकडे अनेक रिक्षा चालक या मोबाईलचा अगदी सर्रास वापर करतात. अनेक सामान्य नागरिकांना हा अनुभव रोजच येत असतो. अनेक जण याबद्दल व्यक्तही होताना पाहायला मिळतात. अशातच कलाकार मंडळींनाही रिक्षा चालकांच्या या मोबाईल बघण्याच्या सवयीचा त्रास होत आहे आणि याबद्दल ही कलाकार मंडळी आपल्या सोशल मीडियाद्वारे व्यक्त होतानाही दिसतात. असंच काहीसे झाले आहे मंजिरी ओक यांच्याबद्दल. मंजिरी ओक या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. (manjiri oak angry on auto driver)
सोशल मीडियावर त्या त्यांचे अनेक फोटो व प्रसाद ओक यांच्याबरोबरचे मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतात. अशातच त्यांनी नुकताच शेअर केलेला व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे आणि हा व्हिडीओ आहे रिक्षा चालवताना मोबाईल बघणाऱ्या चालकाचा. मंजिरी ओक यांनी रिक्षा चालवताना मोबाईल बघणाऱ्या चालकाचा व्हिडीओ शेअर केला आहे आणि असं म्हटलं आहे की, “पैसे देऊन आणि वर आपला जीव मुठीत घेऊन, असा प्रवास का करायचा? आणि यावर यांना काही बोलायच नाही. कारण यांचीच अरेरावी ऐकून घ्यायला लागेल. दोनदा सांगूनही काही सुधारणा न झाल्यामुळे मी रिक्षा बदलली”.
यापुढे ती म्हणाली, “आणि तरी ही त्याला काही फरक पडला नाही. म्हणजे भाडं गेलं तरी चालेल. समोरच्याचा आणि स्वतःचाही जीव धोक्यात घालीन, पण मी रिक्षा चालवताना असा फोन बघणारच. पूर्ण वेळ हा असाच रिक्षा चालवतो असं अत्यंत अभिमानानी सांगितलं त्यांनी मला. एकूणच कठीण आहे सगळं. देव त्याला अक्कल देवो”. या व्हिडीओखाली अनेकांनी कमेंट्स करत याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “हा प्रकार वाढला आहे आणि यांची अरेरावी पण”, “डोकीच गहाण पडली असतील तर काय करणार, कर्म तैसे फळ मिळेल” खरं आहे हे खुप वाढलं आहे, तरुण पण आणि वायाने मोठे असलेले पण हे करतात”. अशा अनेक कमेंट्स करत या व्हिडीओला नेटकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी हाच प्रकार अभिनेत्री रेश्मा शिंदेबरोबरही झाला होता. रेश्मानेही याबद्दलचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. “तुम्हाला असा अनुभव आला आहे का? रिक्षा चालक असेच व्हिडीओ, रील्स बघत रिक्षा चालवतो का?” असं म्हणत तिने व्हिडीओ शेअर केला होता. सकाळी सहा वाजता हा व्हिडीओ रेश्माने शेअर केला होता. अशातच आता मंजिरी ओक यांचा या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.