भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भारत मंडपम इथे पहिल्या ‘नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड’ सोहळ्याला हजेरी लावली. या पुरस्कारासाठी तीन आंतरराष्ट्रीय क्रिएटर्सबरोबर भारतातील २३ क्रिएटर्सना पुरस्कार देण्यात आले. युट्युब, डिजिटल क्रिएटर्स यांचे रील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. या क्रिएटर्सचा सन्मान भारत सरकारच्या वतीने करण्यात आला. यावेळी एका मराठमोळ्या युट्युबरला नामांकन जारी करण्यात आलं होतं. हेरिटेज फॅशन आयकॉन कॅटेगिरीत अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिला नामांकन होतं. (Urmila Nimbalkar On National Creators Award)
उर्मिलाने या नामांकनाबाबत सोशल मीडियावरुन एक खास पोस्ट शेअर करत सांगितलं. दरम्यान, अभिनेत्रीने चाहत्यांना वोटसाठी आवाहनही केलं होतं. मात्र सर्वाधिक मतं मिळूनही अभिनेत्रीला पुरस्कार मिळाला नाही. याबाबत आता स्वतःच उर्मिलाने पोस्ट शेअर करत सांगितलं आहे. याबाबतची इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ती म्हणाली आहे की, “Creator’s National Award च्या Heritage Fashion Icon Category मध्ये सर्वाधिक मतं मला मिळाली यासाठी माझ्या मंडळींना खूप प्रेम, vote नंतर अंतिम निर्णय ज्यूरींचा होता त्यामुळे पुरस्कार नाही मिळाला, पण तुम्ही सदैव पाठीशी आहात याचा जास्त आनंद आहे”.
याबरोबरच उर्मिलाने सोशल मीडियावर एक व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती असं बोलताना दिसत आहे की, “हेरिटेज फॅशन आयकॉनसाठी जान्हवी सिंग हिला नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड मिळाला. तिने फॅशनच्या बाबतीतील व्हिडीओ इन्स्टाग्रामवर बनवले आहेत. तिचं मनापासून अभिनंदन. भारतीय पोशाख, साड्या, टेक्सटाइल या संदर्भात ती माहिती देत आहे, याचा आनंद आहे. सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. पण, हा ज्युरी अवॉर्ड होता”, असं ती म्हणाली.
पुढे अभिनेत्री म्हणाली, “वोटिंगनुसार आपण पहिले आहोत. यासाठी तुमची आभारी आहे. तुमच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचले. ज्युरीनुसार अवॉर्ड देतील हे कोणालाच माहीत नव्हतं. पण, वोटिंगनुसार आपण विजेते आहोत,” असं ती बोलताना दिसत आहे. उर्मिला ही प्रसिद्ध व लोकप्रिय युट्युबर असून तिचा खूप मोठा फॅन फॉलोविंग आहे. फॅशन जगतातील तिचे व्हिडीओ चाहत्यांच्या नेहमीच पसंतीस पडतात.