Amruta Khanvilkar Birthday : मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर नेहमीच चर्चेत असते. अनेक मालिका, चित्रपट, वेबसीरिज यांमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी करुन अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. केवळ मराठीमध्ये मर्यादित न राहता अमृताने बॉलीवूडमध्ये देखील आपला दबदबा निर्माण केला. त्यामुळेच तिचा चाहता वर्ग बऱ्यापैकी मोठा आहे. सोशल मीडियावरही अमृता नेहमीच सक्रिय असते. नेहमीच काही ना काही शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आज अमृताचा वाढदिवस आहे. अमृताच्या वाढदिवसानिमित्त तिच्या नवऱ्याने म्हणजेच हिमांशू मल्होत्राने खास पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
हिमांशूने अमृताच्या वाढदिवसानिमित्त तिच्याबरोबरचा फोटो पोस्ट करत खास पोस्ट लिहिली आहे. यावेळी त्याने असं म्हटलं आहे की, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अमु. माझ्या तुम्हाला सदैव शुभेच्छा आणि यापुढेही राहतील. तुम्ही प्रगती करत असताना तुम्ही स्वत:ला चांगले दाखवत आहात आणि मला तुमचा खरोखर अभिमान आहे आणि नेहमीच असेल. तुम्हाला प्रत्येक कानाकोपऱ्यातून प्रेम, शांती, शुभेच्छा आणि आशीर्वादांनी भरलेले वर्ष जावो अशाही शुभेच्छा. खूप सारं प्रेम”.
या पोस्टवर अमृतानेही कमेंट करत त्याचे आभार मानले आहेत. अमृताने या पोस्टवर कमेंट करत, “मी माझं आयुष्य तुझ्याशिवाय विचारही करु शकत नाही. तुझा पाठिंबा आणि तू खूप महत्त्वाचा आहेस. आभारी आहे”, असं म्हटलं आहे. अमृता तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही बरेचदा चर्चेत राहिली आहे. हिमांशू मल्होत्रासह तिने लग्नगाठ बांधली आहे. मात्र नवऱ्याबरोबरचे फारसे फोटो ती सोशल मीडियावरुन शेअर करत नाही यावर तिने बरेचदा मुलाखतीत भाष्य केलं आहे.
हिमांशुबरोबरचे फोटो पोस्ट करत नाही यावर अमृताने ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना अमृता म्हणाली, “माझं काम आणि मी इन्स्टाग्रामवर काय शेअर करते ते काहीवेळा त्यांना आवडते, पण जेव्हा ते मला आणि माझ्या कुटुंबाला किंवा हिमांशूला ट्रोल करायला लागतात ते मला आवडत नाही. त्यामुळे मी त्याच्याबद्दल खूप काही पोस्ट करत नाही. कारण मी त्याला सुरक्षित ठेवू इच्छिते. माझ्यासाठी तो बाहेर असण्यापेक्षा त्याचे रक्षण करणे अधिक महत्त्वाचे आहे. त्याचं कारण म्हणजे तो या इंडस्ट्रीतून नाही. कोणत्या प्रकारे होणाऱ्या ट्रोलिंगला आणि द्वेषासाठी तो पात्र नाही, कारण या सगळ्यामुळे त्याला दु:ख होऊ शकतं. मी नेहमीच याची काळजी घेतली, घेते आणि घेत राहीन”.