माजी भारतीय क्रिकेटपटू व सध्या कॉमेडी शो कपिल शर्माच्या विनोदी कार्यक्रमात नवज्योत सिंह सिद्धू दिसून येतात. या कार्यक्रमामध्ये परीक्षकाच्या भूमिकेत बघायला मिळाले. त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळेही अधिक चर्चेत राहिले आहेत. काही दिवसांपूर्वी सिद्धू यांच्या पत्नीला कर्करोग असल्याचे समजले होते. त्याबद्दल केलेल्या विधानामुळे ते आता चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांची पत्नी नवजोत कौर यांना संतुलित आहारामुळे लवकर बरे होता आले असे त्यांनी सांगितले आहे. तसेच जीवनशैलीमध्ये बदल केल्याने ४० दिवसांतच तब्येतीमध्ये सुधारणा झाली असल्याचा दावादेखील त्यांनी केला आहे. त्यामुळे हे सगळं उपचाराशिवाय कसं शक्य आहे? असा प्रश्नदेखील सगळ्यांना पडला आहे. (navjot singh siddhu wife cancer)
सिद्धू यांच्या पत्नीला स्टेज ४चा कर्करोग झाला होता. मात्र आहार व जीवनशैलीमध्ये बदल करुन केवळ ४० दिवसांत कर्करोगावर नियंत्रण मिळवले असे त्यांनी सांगितले. तसेच पत्नीच्या कर्करोगासाठी त्यांना एकही पैसा खर्च करावा लागला नसल्याचेही त्यांनी सांगितले. याबद्दल त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, “पत्नीच्या आहारात हळद, लिंबाचे पाणी, सायडर व्हीनेगर, लिंबू पाणी, बीट, गाजर असे पदार्थ खाण्यास दिले. साखर व कार्बोहायड्रेट्स पूर्णपणे बंद केले होते”.
त्यानंतर त्यांनी सांगितले की, “पत्नीची उपवास करण्याची सवय खूप उपयोगी पडली. यामध्ये त्यांचं शेवटचं जेवण संध्याकाळी ६.३० वाजता आणि पहिले जेवण १०.३० वाजता व्हायचं. दिवसाची सुरुवात लिंबू पाण्याने व्हायची. त्यामुळे तिचं २५ किलो वजन कमी झालं आणि फॅटी लिव्हरची समस्या कमी होण्यास मदत झाली”.
दरम्यान सिद्धू यांच्या या दाव्यावर डॉक्टरांनीदेखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’ने एशियन हॉस्पिटलच्या ऑन्कोलॉजीचे अध्यक्ष डॉ. पुनीत गुप्ता यांनी सांगितले की, “कर्करोग फक्त आहाराने बरा करता येत नाही. कर्करोगापासून रक्षण करण्यासाठी आहार खूप महत्त्वाचा आहे”. त्यामुळे आता सिद्धू यांच्या दाव्यामध्ये किती तथ्य आहे? याबद्दल सर्वत्र चर्चा सुरु आहे.