‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय शोमधून घराघरात पोहोचलेले कलाकार म्हणजे अभिनेता प्रसाद जवादे व अभिनेत्री अमृता देशमुख. ‘बिग बॉस’ या शोमध्ये अमृता-प्रसादची एकमेकांबरोबर मैत्री झाली आणि त्यांच्यातील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. यानंतर दोघांनी डेस्टिनेशन वेडिंग करत शाही विवाहसोहळा उरकला. त्यांचे लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसले. अमृता-प्रसाद ही जोडी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. अशातच अमृताने अभिनयाव्यतिरिक्त स्वतःच युट्युब चॅनेल सुरु केलं आहे. अद्याप या युट्युब चॅनेलला तिने नाव दिले नसून अमृता देशमुख या नावाने ते सुरु आहे. (Amruta Deshmukh New Vlog)
नव्या युट्युब चॅनेलच्या या व्हिडीओवर अमृताने शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती किचनमध्ये जात जेवण बनवायला शिकत आहे. या व्हिडीओमध्ये अमृता असं बोलत आहे की, “ती पहिल्यांदा किचनमध्ये काहीतरी बनवणार आहे. तिचा हा व्हिडीओ रेसिपी बनवायला शिकतानाचा आहे. आणि यावेळी ती साबुदाण्याची खिचडी बनवत आहे. आणि हे पाऊल तिला नाईलाजाने उचलावं लागलं आहे. यामुळे अभिनेत्रीची थोडीशी चिडचिडही झाली. मात्र तिने ती फार कमी व्यक्त केली. अमृताचा नवरा प्रसाद हा उत्तम शेफ आहे. आणि त्याने उत्साहाने साबुदाणा भिजवून ठेवला होता, पण कामामुळे अचानक त्याला जावं लागलं आणि अमृताही प्रयोगानिमित्त बाहेर गेली. त्यामुळे भिजवलेला साबुदाणा तसाच होता. आणि अमृताला जेवण बनवता येत नसलं तर तिला अन्न वाया गेलेलं आवडत नाही. म्हणून अखेर तिने युट्युबवर रेसिपी बनवून साबुदाणा खिचडी बनवण्याचा निर्णय घेतला.
आयुष्यात पहिल्यांदा कोणाचीही मदत न घेता तिने ही खिचडी बनवली आहे. आणि तिच्या युट्युब चॅनेलच्या पहिल्याच व्हिडीओमध्ये तिने हा जेवण बनवायला शिकतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानंतर रेसिपी पाहून अमृताने खिचडी बनवली. तिच्या आईच्या म्हणण्यानुसार तिने केस मोकळे सोडून नाहीतर केस बांधून किचनमध्ये काम करायला सुरुवात केली. आणि सुंदर, खमंग अशी साबुदाणा खिचडी बनवली. या व्हिडीओमध्ये असं पाहायला मिळालं की, अमृताचा किचनमधील वावर फारच कमी आहे तरीदेखील शिकण्याच्या जिद्दीपायी ती जेवण बनवायला शिकली आणि तिने उत्तम साबुदाणा खिचडी बनवली.
अमृताला जेवण बनवायला येत नाही वा ती जेवण बनवायचा कंटाळा करते याबाबत प्रसादने जाहीरपणे सांगितले होते. काही दिवसांपूर्वीच प्रसादने ‘पारू’ मालिकेच्या प्रोमोशनच्या निमित्ताने होम मिनिस्टर या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी बोलताना त्याने अमृताच्या पाच खटकणाऱ्या गोष्टींबाबत भाष्य केलं होतं. तेव्हा प्रसादने “तिने पूर्णपणे स्वयंपाक शिकावा अशी माझी अजिबात इच्छा नाही”, असं म्हटलं होतं. यावरुन अमृताचा किचनमधील वावर कळला होता.