हिंदीसह मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने सर्वांना ‘वेड’ लावणारा ‘लयभारी’ अभिनेता व दिग्दर्शक म्हणजे रितेश देशमुख. रितेश देशमुखने मनोरंजन सृष्टीत आपली वेगळी वाट निवडली असली तरी देशमुख घराणं हे अनेक वर्षांपासून काँग्रेसबरोबर जोडलेलं आहे. विलासराव देशमुख यांच्यानंतर त्यांची दोन्ही मुलं अमित व धीरज देशमुख यांनी काँग्रेसची भक्कम साथ दिली आहे.
आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा रितेश सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याच्या पत्नीसह अनेक व्हिडीओ शेअर असतो. अशातच त्याने नुकताच त्याचे वडील व दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. “माझ्या वडिलांच्या आठवणीत” असं म्हणत रितेशने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये विलासराव देशमुखांनी असं म्हटलं आहे की, “लोकांची चळवळ म्हणजे काँग्रेस. इतका विस्तार आहे काँग्रेसचा. अनेकांनी प्रयत्न केले काँग्रेस संपवायचे. ते संपले, पण काँग्रेस नाही संपली. त्यागाचा, बलिदानाचा, देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा हा एवढा प्रचंड इतिहास काँग्रेसला आहे. ही काँग्रेस अशी कुणाला संपवता येऊ शकत नाही. काँग्रेसने नेहमीच गरिबांचा विचार केला. आजही काँग्रेस म्हणत आहे, काँग्रेसचा हाथ, आम आदमी के साथ. ही काँग्रेसशी भूमिका आहे. आम आदमी म्हणजे सामान्य माणूस.
यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “काँग्रेसचा हात केवळ श्रीमंतांबरोबर नाही, तर समाजातल्या प्रत्येक जातीधर्माचा गरीब माणूस. सामान्य जनतेबरोबर आहे, गरिबांचा हाथ या काँग्रेसने धरला आहे. ही भूमिका काँग्रेसने स्वीकारली आहे. महिलांचा सन्मान वाढवण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे. कालपर्यंत ३३% आरक्षण होतं ते आता ५०% झालं आहे. जिल्हापरिषद, नगरपरिषद, कॉर्पोरेशनमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात त्या भगिनींना मानाचं स्थान निर्माण करुन देण्याचे काम काँग्रेसने केलं आहे”.
यापुढे “काँग्रेस कामाच्या बळावर मतं मागते, आश्वासनावर नाही. बाकीचे लोक आश्वासनावर तुमच्याकडे मत मागत आहेत. पण काँग्रेस केलेल्या कामावर आणि विचारावर उजळ माथ्याने मत मागते. त्यामुळे मत मागण्याचा नैतिक अधिकार हा आमच्याकडे म्हणजेच काँग्रेसकडे आहे” असं विलासराव यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
आणखी वाचा – वृषभ, कन्या, तूळ राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस भाग्याचा, महत्त्वाचे कामे पूर्ण होणार, जाणून घ्या…
दरम्यान, राज्यात लोकसभा निवडणूकीमध्ये काँग्रेसने मुसंडी मारल्यानंतर देशातील राजकीय गणितं पुन्हा एकदा बदलल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे रितेशने शेअर केलेला विलासराव देशमुख यांचा हा व्हिडीओ सध्या साऱ्यांचच लक्ष वेधून घेत आहे.