काही दिवसांपूर्वी ठाण्यात मुक्या प्राण्यांच्या ग्रूमिंग सेशन सेंटरमध्ये कर्मचाऱ्याने एका श्वानाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. पाळीव प्राण्यांची शुश्रूषा करणाऱ्या सेंटरमध्ये कर्मचाऱ्याने एका श्वानाला मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा धक्कादायक प्रकार समोर येताच मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
श्वानाला मारहाण करतानाचा संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पोलिसांनी कारवाई करत मारहाण करणाऱ्या मयुर आडाव व प्रशांत गायकवाड यांना ताब्यात घेतलं होतं. परंतु, काही दिवसांत या दोघांची सुटका झाली होती. सुटका होताच हे दोघेही सध्या फरार आहेत. ‘स्ट्रिट डॉग्ज ऑफ बॉम्बे’ या प्राणीप्रेमी संस्थेने पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
या आरोपींची सुटका झाल्याचं समजताच मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधव व हेमंत ढोमे यांनी या संपूर्ण प्रकरणावर त्यांची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सिद्धार्थ व हेमंत यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबद्दलचे त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
सिद्धार्थने त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत “कुत्र्याला मारहाण व हिंसाचार करून, ५० ते १०० रुपये दंड भरून जर सुटका होत असेल आणि त्यातून तुम्ही पळ काढण्यात यशस्वी होत असाल तर अवघड आहे. हे योग्य आहे का?” असा संतप्त सवाल व्यक्त केला आहे. तर हेमंतने “लोक सहज सुटून पळू शकतात. गुन्हेगार पळतो, सामान्य अडकतो” असं म्हटलं आहे. तसेच क्षिती जोगनेही ही पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे.