मराठी रंगभूमीवरील बहुरुपी अभिनेते म्हणजे प्रशांत दामले. प्रशांत दामलेंनी आजवर अनेक नाटकं, मालिका, चित्रपट व जाहिरातींमध्ये काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या काळजात घर करणाऱ्या प्रशांत दामलेंना २०१३ मध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. प्रशांत दामलेंनी नुकतीच ‘सोलसम विथ सारिका’ नावाच्या एका यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या हृदयविकाराच्या झटका आल्याबद्दलच्या त्या प्रसंगाबद्दल सांगितले आहे.
मे २०१३ साली प्रशांत दामलेंना हृदयविकाराचा झटका आला होता. यावेळी प्रशांत दामले यांना त्यांच्या मुलीने रुग्णालयात दाखल केले होते. तेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना त्यांनी आपल्या मुलीला “पाच मिनिटांत आलो गं” असं म्हटलं होतं. या मुलाखतीदरम्यान, त्यांच्या या प्रसंगाबद्दल त्यांना “तुमच्या या विनोदी स्वभावामुळेच गंभीर परिस्थितीतही तुम्ही इतके शांत असता का?” असा प्रश्न विचारण्यात आला.
याचे उत्तर देत प्रशांत दामले असं म्हणाले की, “डॉक्टरांवरचा विश्वास. त्यावेळी डॉक्टर मला आतमध्ये गेल्यानंतर स्क्रीनवर सगळं दाखवत होते. तेव्हा उपचार करताना त्यांनी मला ५-६ मिनिटे दुखेल असं सांगितलं. यानंतर त्यांनी पुन्हा ४-५ सेकंद तुझं हृदय बंद होईल असं सांगितलं होतं. त्यानंतर अर्ध्या तासाने मी त्यांना माझ्या हृदयातलं दुसरं ब्लॉकेज काढण्यासाठीही सांगितलं. तेव्हा डॉक्टरांनीही गंमतीने “तू आता आमच्या ताब्यात आहेस, त्यामुळे जास्त हुशारी करु नकोस. आपण परवा बघू”.
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “हा सर्वस्वी विश्वासाचा भाग आहे. प्रेक्षक जसे एखाद्या कलाकाराच्या नाटकाला विश्वासाने जातात. तसे आम्ही कलाकार किंवा अगदी सामान्य प्रेक्षकही डॉक्टरांकडे विश्वासाने जातात. तुम्ही तुमचे शरीर विश्वासाने डॉक्टरांच्या हातात दिल्यानंतर तो विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी डॉक्टरांची आहे आणि मला माहिती होतं की, मी काय इतक्या लवकर जाणार नाही”. दरम्यान, या हृदयविकाराच्या झटक्यानंतर प्रशांत दामले यांची प्रकृती अगदी उत्तम असून अनेक नाटकांद्वारे ते प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांच्या अनेक नाटकांना प्रेक्षकांकडून तूफान प्रतिसादही मिळत आहे.