हिंदी व मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाच्या जोरावर छाप पाडणारा अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे. अनेकवर्ष श्रेयसने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड केलं. काही दिवसांपूर्वीच श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला. फिटनेस फ्रिक असलेल्या श्रेयसच्या बाबतीत ऐकलेली ही बातमी साऱ्यांना आश्चर्याचा धक्का देऊन गेली. श्रेयसच्या आजारपणाच्या बातमीमुळे चाहतेही काळजी व्यक्त करताना दिसले. श्रेयसच्या या आजारपणात त्याची पत्नी दीप्ती हिने त्याला खूप साथ दिली. आता श्रेयस बरा झाला असून नुकतीच त्याने ‘एबीपी माझा’च्या ‘माझा कट्टा’ला मुलाखत दिली. (Shreyas Talpade On His Health Update)
यावेळी बोलताना श्रेयसने त्याच्या या आजारपणाबाबत भाष्य केलं. श्रेयस म्हणाला, “हृदयविकाराचा झटका कोणालाही येऊ शकतो. पण, माझं दैनंदिन आयुष्य खूप शिस्तबद्ध असल्याने या सगळ्यासाठी मला शरीराने खूप वेळ दिला. हृदयविकाराचा झटका आल्यापासून ते हॉस्पिटलला जाईपर्यंत माझ्याकडे जवळपास दीड तास होता. शूटिंग संपवून मी घरी आलो. त्यानंतर फोन करून डॉक्टरांकडे गेलो. ट्राफिकमध्ये अडकलो. हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या ५ मिनिटे आधी मला अरेस्ट आला. पण, एवढा वेळ मला माझ्या शरीराने दिला. हल्ली कार्डियक अरेस्टने तिथल्या तिथे लोकांचा मृत्यू होतो. कधी कधी तुम्हाला शरीर वेळ देत नाही. पण, मी शिस्तबद्ध आयुष्य जगत असल्याने माझ्या शरीराने मला हा वेळ दिला”.
यापुढे तो म्हणाला, “ऑक्टोबर २०२२मध्ये मला पहिल्यांदा शरीराबद्दल काही वेगळं जाणवलं, आणि शरीराने असे सिग्नल दिले तर मी त्याकडे कधीच दुर्लक्ष करत नाही. तेव्हा शूट संपल्यानंतर मला घश्याच्या इथे काहीतरी जाणवत होतं. मला दमल्यासारखं वाटत होतं. मग मी डॉक्टरांकडून चेकअप करून घेतलं होतं. कारण, माझ्या कुटुंबात अनेकांचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झालेला आहे. त्यामुळे मी आधीपासूनच जास्त काळजी घेतो. पण, तेव्हा सगळं नॉर्मल होतं,” असंही पुढे श्रेयस म्हणाला.
पुढे त्याने सांगितलं, “हृयविकाराचा झटका आला त्यादिवशी मी वेलकमसाठी शूटिंग करत होतो, हारनेसचा १०-१२ किलो वजनाचा बेल्ट लावून मी शूटिंग केलं होतं. शूटिंग दरम्यान मी मजामस्तीही करत होतो. पॅकअप झाल्यानंतर व्हॅनकडे जाताना मला थकवा जाणवला. मी कसाबसा चालत व्हॅनपर्यंत गेलो, घरी जाण्यासाठी बूट घालायला मी खाली वाकलो तर मला छातीत खूप जड असल्यासारखं जाणवलं. म्हणून मी बूटही न घालता साधी चप्पल घालून निघालो. घरी जाताना मला बैचेन झाल्यासारखं वाटत होतं. माझा डावा हातही दुखत होता. मला वाटलं की शूटिंगमुळे असेल. घरी गेल्यानंतर दीप्तीने डॉक्टरांना फोन केला. मीदेखील त्यांच्याशी बोललो. मग दीप्तीने त्यांना सांगितलं की मी त्याला हॉस्पिटलला घेऊन येतेय.”
पुढे श्रेयस असंही म्हणाला की, “माझं ब्लडप्रेशर खूप जास्त होतं. माझ्या मुलीच्या नानीने माझ्या हाताला मसाजही करून दिली तरीही माझा डावा हात दुखत होता, हॉस्पिटलला जाताना थोडसं ट्राफिक लागलं होतं. मी हॉस्पिटल आल्याचं बघितलं. पण, तेवढ्यात माझ्या चेहऱ्याला मुंग्या आल्या, आणि एका सेकंदात मी ब्लॅक झालो. आपण रिमोटने टीव्ही जसा बंद करतो, हे तसंच होतं. त्याच्यापुढचं मला काहीच आठवत नाही,” असंही सांगितलं.