घर ही सर्वसामान्यांपासून ते प्रत्येक कलाकाराचीही गरज आहे. स्वतःचं हक्काचं घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. घराचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजण दिवसरात्र मेहनत करत असतात. कलाकारांच्या घराचं खासकरून चाहत्यांना आकर्षण असतं. घराचेच नव्हे तर त्यांच्या वौयक्तिक आयुष्याबाबतही जाणून घ्यायला चाहत्यांना आवडत. अशातच एका अभिनेत्याच्या घराविषयी सर्वत्र चर्चा रंगलेली आहे. हा अभिनेता म्हणे अक्षय कुमार. लोकप्रिय कंटेंट क्रिएटर चांदनी भाभदाने अक्षय कुमारचा फ्लॅट खरेदी केल्याचं समोर आलं आहे. (Akshay Kumar House)
वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी चांदणी भाभदा हिने स्वतःचं हक्काचं मुंबईत घर घेतलं आहे. सोशल मीडियावर असंख्य कंटेंट क्रिएटर्स आहेत. पण काही कंटेंट क्रिएटर्सनी त्यांच्या वेगळ्या कला- कौशल्याने नेटकऱ्यांसह सेलिब्रिटींचीही मनं जिंकली आहे. सोशल मीडियावर चांदनी मिमिक या नावाने ती विशेष लोकप्रिय आहे. चांदनी आलिया भट्टची हुबेहुब मिमिक्री करते. आणि हे पाहून स्वतः आलियानेही तिचं कौतुक केलं आहे.
चांदनी भाभदाने अक्षय कुमारचा अंधेरीतला फ्लॅट खरेदी केला आहे. गृहप्रवेश करतानाचे फोटो तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पहिल्या दोन फोटोंमध्ये चांदनी पूजा करताना दिसत आहे. तिसऱ्या फोटोमध्ये डोक्यावर कलश घेऊन गृहप्रवेश करताना दिसत आहे. हे गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत तिने, “वयाच्या २५ वर्षांच्या आधी घर खरेदी केलं. घराचा ईएमआय भरत आहे.” असं कॅप्शन दिलं आहे.
वयाच्या २४व्या वर्षी चांदनीने स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केल्यामुळे कलाकार मंडळींसह, प्रेक्षकांनीही तिच्यावर भरभरुन कौतुकाचा वर्षाव केलेला पाहायला मिळत आहे.