बॉलिवूडसह मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे. नुकतीच त्याच्या तब्येतीबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्रेयस ‘वेलकम टू जंगल’ या चित्रपटांचं चित्रीकरण करत होता. ते संपवून तो घरी आला असताना ही घटना घडली असल्याचे म्हटले जात आहे. चित्रीकरणानंतर घरी येताच त्याला अस्वस्थ वाटत असल्याचं पत्नीला सांगितलं. त्यानंतर त्याला लगेच अंधेरीमधील बेलव्हू रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली.
श्रेयस हा दिवसभर चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एकदम व्यवस्थित होता. चित्रीकरण करताना तो सर्वांशी मज्जा-मस्ती व विनोददेखील करत होता. तसेच त्याने थोडेसे अॅक्शन असलेले सीक्वेन्सही शूट केले. मात्र घरी येताच त्याला अस्वस्थ वाटू लागलं आणि ही गोष्ट त्याने त्याच्या पत्नीला सांगितली. यावर ती त्याला लगेच रुग्णालयात घेऊन गेली. त्याच्या तब्येतीबाबत रुग्णालयाने असे म्हटले आहे की, रात्री १० वाजण्याच्या सुमारास श्रेयस तळपदेची अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्याच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे.
आणखी वाचा – Video : कोकणात स्वतःच्या गावी पोहोचली पूजा सावतं, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक, म्हणाली, “माझं घर…”
अशातच श्रेयसची तब्येत आता बरी असून त्याच्यावरील मोठा धोका टळला आहे. त्याच्या तब्येतीत आता लवकर सुधारणा होत असल्याचेही कळत आहे. तरीही त्याला विश्रांतीसाठी आणखी दोन दिवस रुग्णालयात ठेवणार असल्याचेही म्हटले जात आहे. दरम्यान, त्याच्या तब्येतीची बातमी कळताच चाहत्यांना धक्का बसला. त्यामुळे श्रेयसच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी आणि तो बरा व्हावा यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
दरम्यान, झी मराठी वरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून श्रेयस घराघरात पोहोचला. तसेच त्याच्या आगामी ‘वेलकम टू जंगल’ चित्रपटात श्रेयससह अक्षय कुमार रवीना टंडन, दिशा पटानी, जॅकलिन फर्नांडिस, लारा दत्ता, सुनील शेट्टी, संजय दत्त, परेश रावल, अर्शद वारसी, तुषार कपूर, राजपाल यादव, जॉनी लीव्हर, किकू शारदा व कृष्णा अभिषेक आदी कालाकार आहेत.