‘किंग खान’ म्हणून स्वतःची ओळख निर्माण केलेल्या शाहरुख खानची जगभरात क्रेज आहे. शाहरुखने त्याच्या लाइफस्टाइलने व अभिनयाच्या जोरावर स्वतःचा असा खूप मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. या असंख्य चाहत्यांच्या यादीत सिनेसृष्टीतील अनेक अभिनेते, अभिनेत्री यांचाही समावेश आहे. शाहरुख खानला भेटता यावे, शाहरुख खानची झलक पाहता यावी यासाठी कित्येक चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. अनेकांना शाहरुखला एकदा तरी पाहता येण्याचे वेध लागले आहेत. अशातच अभिनेता शशांक केतकरच्या पत्नीला म्हणजेच प्रियांकाला ही शाहरुखच्या भेटीची ओढ लागली आहे. (Shashank Ketkar Wife On Shahrukh Khan)
अभिनेता शशांक केतकरची पत्नी प्रियांकाने केलेली पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. अभिनेता शशांक केतकरने आजवर त्याच्या अभिनय शैलीच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. छोट्या पडद्यामुळे शशांक घराघरांत पोहोचला. ‘होणार सून मी या घरची’, ‘हे मन बावरे’ या मालिकांमधून शशांकने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या मालिकांमधील शशांकच्या भूमिका तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरल्या होत्या. त्याची पत्नीही शशांकची खूप मोठी फॅन आहे. शिवाय ती किंग खान म्हणजेच शाहरुख खानची ही खूप मोठी फॅन आहे. याचीच एक पोस्ट तिने सोशल मीडियावरून शेअर केली.
प्रियांकाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती शाहरुख खानबरोबर पाहायला मिळतेय. या फोटोत प्रियांका खुर्चीत बसली आहे तर शाहरुख तिच्या मागे उभं राहून तिचा मेकअप करत असल्याचं पाहायला मिळत आहे. तिचा हा फोटो AI च्या मदतीने तयार करण्यात आला आहे. या फोटोखाली तिने, “किंग खानला खरं कधी भेटेन माहित नाही, पण निदान A.I.च्या मदतीने हे दृश्यरूपात पाहणं शक्य झालं”, असे कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.
![](https://marathi.itsmajja.com/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Image-2023-10-18-at-12.54.30-PM-jpeg.webp)
प्रियांकाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत प्रियांकाला सुनावलं आहे. एका युजरने कमेंट करत म्हटलं आहे की, “प्रियांका दिदी आपला शशांक दादाही शाहरुख खानपेक्षा कमी नाही”, तर आणखी एकाने म्हटलं आहे की, “तुमचा नवरा पण शाहरुख पेक्षा कमी नाही. मराठी मुली मरायच्या त्याच्यावर, गाजलेल्या टीव्ही मालिकांच्या वेळी”. तर आणखी एका युजरने, “तुझा नवरा शाहरुखपेक्षा खूप चांगला आहे. मराठीतला शाहरुख खान.” अशी कमेंट केली आहे.