‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटात संजय नार्वेकर यांच्या मनातला आवाज ऐकणारी छोटी मुलगी नेमकी कोण या प्रश्नाचं उत्तर आता साऱ्यांसमोर आलंय. सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांची लेक सना शिंदे. अगं बाई अरेच्चा या चित्रपटात सनाचा अगदी छोटा असलेला रोल भाव खाऊन गेला. त्यानंतर सना झळकली ती तिच्या आजोबांच्या म्हणजेच ‘शाहीर साबळे’ यांचा जीवनपट “महाराष्ट्र शाहीर” या चित्रपटात. ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटामुळे सनाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. (Kedar Shinde On Sana Shinde)
‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातील बहरला मधुमास या गाण्याची क्रेज आजही कमी झालेली नाही. सना व अंकुश यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याने लाखो दिलांच्या मनावर राज्य केलं. या गाण्यामुळे सना घराघरांत पोहोचली. तब्बल २० वर्षांनी सनाने रुपेरी पडद्यावर पाऊल टाकलं आणि प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ‘महाराष्ट्र्र शाहीर’ या चित्रपटात सनाने शाहिरांच्या पत्नीची भूमिका साकारली होती.
प्रेक्षकांच्या लाडक्या सनाचा आज वाढदिवस आहे. सनाच्या वाढदिवसानिमित्त तिचे वडील दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलेली पोस्ट लक्ष वेधून घेत आहे. सनाच्या वडिलांनी ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील तिचा एक फोटो पोस्ट करत म्हटलं आहे की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा. मोठी हो. यशस्वी हो. डोकं जमिनीवर आणि पाय जमिनीच्या आत राहू देत. यशात आणि अपयशात एकच लक्षात ठेव हे दिवसही सरतील. श्री स्वामी कृपा सदैव राहो. तेच सांभाळतील तुला.” असं म्हणत लेकीला शुभेच्छा देत शुभाशीर्वाद दिले आहेत.
केदार शिंदे यांनी लेकीच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या पोस्टवर अभिनेत्री अमृता खानविलकरने कमेंट करत सनाला शुभेच्छा दिल्या आहेत. केदार शिंदे यांनी ‘महाराष्ट्र्र शाहीर’, ‘बाईपण भारी देवा’ यांसारख्या हिट झालेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने तर बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला.