‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री रोशेल राव आणि कीथ सिक्वेरा यांनी नुकतीच आनंदाची बातमी दिली आहे. दोघांनीही आई बाबा झाल्याची गोड बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. रोशेल राव हिने काही दिवसांपूर्वी एका सुंदर मुलीला जन्म दिला आहे. काही दिवसांपूर्वी या जोडप्याने त्यांच्या चिमुकली बरोबरचा पहिला फोटोही शेअर केला होता. या फोटोमध्ये कीथने रोशेलचा हात धरला होता. त्यानंतर रोशेलने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओमध्ये तिने तिच्या मुलीच्या जन्मानंतर येणाऱ्या समस्या शेअर केल्या आहेत. (Rochelle Rao New Born Baby)
खरं तर, रोशेल व कीथच्या नवजात बाळाचा जन्म होताच त्या बाळाला एनआयसीयूमध्ये दाखल करावे लागले. रोशलने तिच्या इंस्टाग्रामवर यासंदर्भातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या मुलीच्या जन्मापासून ते आत्तापर्यंतची एक झलक दाखवत तिने जन्मानंतर लगेचच तिच्या चिमुकलीला एनआयसीयूमध्ये कसे दाखल करावे लागेल, तसेच त्यांच्या बाळाचे वजन खूपच कमी होते, त्यामुळे बाळाला आपत्कालीन स्थितीत ठेवावे लागले याबाबत सांगितलं.
व्हिडीओ शेअर करताना रोशेलने तिला होणाऱ्या वेदना व्यक्त करत म्हटलं, “तो क्षण खूप भीतीदायक होता. त्या काळात कुटुंबासोबत असणे नेमकं काय असत ते कळालं. बाळाला पहिल्यांदा पाहण्यापासून ते निद्रिस्त रात्रीपर्यंत सर्व काही खूप वेगळे होतं. हे क्षण गेले दोन आठवडे आमच्या आयुष्यातील सर्वोत्तम आणि वेडेपणाचे ठरले आहेत. या लहान बाळावर आपण इतके प्रेम करू, असे कधीच वाटले नव्हते.” अभिनेत्रीने पुढे लिहिले की, “या सुंदर आशीर्वादासाठी देवाचे आभार. आशा आहे की आम्ही त्याला जीवनाची सर्वोत्तम आवृत्ती देऊ शकू.”
या व्हिडिओमध्ये या जोडप्याने आपल्या मुलीला पहिल्यांदा पाहण्यापासून ते तिची काळजी घेण्यापर्यंतचा प्रवास दाखवला. यावेळी त्यांनी त्यांच्या चिमुकलीची प्रकृती बरी केल्याबद्दल कुटुंबाचे तसेच घरातील मदतीचे आभार मानले आहेत. त्यानंतर आता चाहते रोशेल व कीथच्या लेकीचा चेहरा पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.