Shashank Ketkar Wedding Anniversary : मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेता शशांक केतकर. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून शशांक घराघरांत पोहोचला. या मालिकेतील श्री या भूमिकेमुळे शशांकला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. मलिकाविश्वात महत्त्वपूर्ण कामगिरी करत शशांकने प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली. याशिवाय त्याने अनेक चित्रपट, वेबसीरिजमध्येही काम केले आहे. सध्या शशांक स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सोशल मीडियावर शशांक नेहमीच चर्चेत असतो. बरेचदा तो सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करताना दिसतो. इतकंच नव्हे तर तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही नेहमीच काही ना काही शेअर करताना दिसतो.
शशांक त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बरेचदा चर्चेत राहिला आहे. शशांक २०१७ साली प्रियंका ढवळेबरोबर लग्नबंधनात अडकला. आता हे कपल पालकत्वाचा टप्पा एन्जॉय करत आहेत. व्यवसायाने वकील असलेली प्रियांका आणि अभिनेता शशांक लग्नाआधी अनेक वर्ष एकमेकांना ओळखत होते. बायकोबरोबर फिरताना, वेळ घालवतानाच्या अनेक पोस्ट तो वेळोवेळी त्याच्या सोशल मीडियावरुन शेअर करत असतो. आज शशांक व प्रियांकाच्या लग्नाला सात वर्षे पूर्ण झाली आहेत. आज त्याच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्याने खास पोस्ट शेअर केली आहे.
“फक्त ७ वर्ष झाली. बाकी सगळं जग एका बाजूला आणि तुझ्यावरचं प्रेम आणि तू एका बाजूला”, असं कॅप्शन देत शशांकने त्याच्या बायकोबरोबरच्या आठवणी शेअर केल्या आहेत. या व्हिडीओमध्ये त्याने त्यांच्या लग्नातील फोटोंपासून ते आतापर्यंत एकत्र एन्जॉय करतानाचे फोटो शेअर केले आहेत. हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस पडला असून नेटकरी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. तर काहींनी त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शशांक केतकर आणि प्रियांकाची ओळख फेसबुकमुळे झाली. दोघेही बरेचदा फेसबुकवर गप्पा मारायचे. त्यानंतर शशांक त्याच्या कामात इतका व्यस्त झाला की, त्यांनी अगदी व्हॉट्सअप वापरणं ही बंद केलं. त्यामुळे प्रियांका व त्याचंही बोलणं कमी झालं. पण नंतर पुन्हा एकदा एका कार्यक्रमात त्यांची भेट झाली आणि दोघांचे बोलणे सुरु झाले आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले.