टेलिव्हिजनवरील मराठी अभिनेता शशांक केतकर हा नेहमी चर्चेत असतो. आजवर त्याने अनेक मालिका, चित्रपट व नाटकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या अभिनयाला सगळ्यांचीची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असते. सध्या तो ‘मुरंबा’ या मालिकेमध्ये तो मुख्य भूमिकेमध्ये दिसून येत आहे. पण आता तो अभिनयामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. तो सोशल मीडियाच्या माध्यामातून अनेक प्रश्न उपस्थित करताना दिसतो. तसेच आजूबाजूला जर काही चुकीचं घडत असेल त्यावर संतापदेखील व्यक्त करतो. अशातच आता त्याने एक नवीन प्रश्न उपस्थित केला असून प्रशासनाच्या कामावर ताशेरे ओढले आहेत. (Shashank ketkar viral video)
काही दिवसांपूर्वी शशांकने ट्राफिकच्या समस्येवर भाष्य केले होते. त्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत याबद्दल सरकारला प्रश्नदेखील विचारले होते. आता पुन्हा एकदा त्याच्या सोशल मीडिया पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने एका चौकाचा फोटो व खड्ड्यांचे साम्राज्य असलेला व्हिडीओ शेयर केला आहे. हे फोटो शेयर केल्यानंतर त्याने एक स्वतःचा व्हिडीओ शेअर करत संपूर्ण माहिती दिली आहे. त्याने व्हिडीओ शेअर करत म्हंटले की, “नमस्कार, जय महाराष्ट्र, मी शेअर केलेले फोटों व व्हिडीओ तुम्ही पाहिले असतीलच. जन्माष्टमीच्या निमित्ताने मला हा व्हीडीओ मुद्दाम टाकावासा वाटतोय. आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही निर्लज्ज राजकारण सुरू आहे. त्यांच्यावर खूप ताणदेखील असतील आणि मला माहीत आहे हे लोक ताण हे सांभाळू शकतील कारण त्यांच्याकडे तितकी व्यवस्था आहे”.
पुढे तो म्हणाला की, “हा प्रश्न फक्त महाराष्ट्राचा किंवा एखाद्या चौकातील नाही तर संपूर्ण देशाचा हा प्रश्न आहे. या फोटोमध्ये रस्त्याची जी काही अवस्था झाली आहे ती बघून मला राग आला आणि लाज वाटली. मला असं झालं की ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला आहे. गेल्या दोन-तीन महिन्यापासून महाराजांचा पुतळा लाल कपड्याने झाकून ठेवला आहे. तो पाहता हा पुतळा कधी स्वच्छ करण्यात येतो की नाही? त्याची काळजी घेतली जाते की नाही? असे अनेक प्रश्न माझ्या मनांत निर्माण होत आहेत. पण पुतळा उभा करुन त्या चौकाची शोभा वाढते पण त्या पुतळ्याचे अजूनही लोकार्पण झाले नाही. आता लोकार्पण कोण करणार? यासाठी राजकारणी कदाचित चिठ्ठ्या उडवणार असतील. पण हा पुतळा तसेच आजूबाजूच्या परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य आहे. यामुळे अनेकांचे अपघात देखील होतात. घरातील कर्ता पुरुष मृत्यूदेखील पावला आहे”.
यानंतर तो म्हणाला की, “हा व्हिडीओ जन्माष्टमीच्या दिवशी कारण म्हणजे याच चौकात दहीहंडीचे मोठे उत्सव साजरे केले जातात. मोठमोठ्या हंड्या उभारल्या जातात. जितके थर तितके मोठे बक्षीसदेखील दिले जातात. यासाठी अनेक मोठमोठे कलाकारदेखील येतात. त्यांचा येण्याचा गाजावाजा केला जातो. हा जो सगळा खर्च दिखाव्यासाठी केला जातो तोच खर्च आमच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी करा. तसेच त्या ठिकाणी गणेशोत्सवाचाही मोठा सोहळा केला जातो. हा चौक खूप महत्त्वाचा आहे. माझी एकच विनंती आहे की सण होईपर्यंत हा रस्ता दुरुस्त केला जाऊ नये. जो राजकारणी या ठिकाणी पुतळ्याचे लोकार्पण करण्यासाठी येईल तेव्हा त्याचा अपघात व्हावा. पाठीचं हाड मोडावं, मूत्राशयाच्या समस्या व्हाव्यात. याचे कारण म्हणजे जोपर्यंत या घटना घडणार नाहीत तोपर्यंत त्यांना हे समजणार नाही. तसेच सामान्य लोकांचे अपघात झाले तर याची जबाबदारी कोण घेणार? असा मी प्रांजळ प्रश्न प्रशासनाला विचारत आहे. त्यामुळे बेशरमिने जे काही सण साजरे करत आहोत. लाखो रुपये उधळले जात आहेत ते सामान्य लोकांच्या समस्या दूर कराव्यात”. दरम्यान आता शशांकने शेअर केलेल्या व्हिडीओची दखल घेतली जाणार का? हे पाहण्यासारखे आहे.