सिनेसृष्टीत बऱ्याच कलाकारांची मुलंही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत अभिनयक्षेत्रात पदार्पण करताना दिसत आहेत. तर काही कलाकारांच्या मुलांनी वेगळे क्षेत्र निवडलेलं पाहायला मिळतं. यांत एक कलाकार अपवाद आहेत ते म्हणजे अभिनेते शरद पोंक्षे. मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या उत्तम अभिनय शैलीमुळे शरद पोंक्षे यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अनेक चित्रपट, नाटक, मालिका यांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत शरद यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करत त्यांच्या मनात घर केलं. शरद पोंक्षे यांच्या लेकीने अभिनयक्षेत्र न निवडता तिने वेगळ्या क्षेत्राची निवड केली आहे. (Sharad Ponkshe On Daughter)
शरद पोंक्षे यांची लेक सिद्धी ही वैमानिक झाली आहे. आज महिला दिनानिमित्त त्यांनी इंस्टाग्राम अकाऊंटवरुन त्यांच्या लेकीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. शरद पोंक्षे यांनी यांची मुलगी सिद्धी वैमानिक होण्याचे शिक्षण घेण्यासाठी परदेशात गेली होती. बारावीत उत्तम गुण मिळवल्यानंतर ती परदेशात शिक्षणासाठी गेली. वैमानिक झाल्यानंतर शरद यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन लेकीसाठी खास पोस्टही शेअर केली होती.
यानंतर आता महिला दिनानिमित्त एक खास पोस्ट शेअर करत त्यांनी लेकीचा एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, “महिला दिनाच्या शुभेच्छा. माझी मुलगी सिध्दी आधी पायलट व काल फ्लाइट इन्स्ट्रक्टर झाली. स्वकष्टाने, मेहनतीने, कोणाच्याही मदती शिवाय तिने हे यश संपादन केलं आहे. एका बापाला आणखी काय हवं?अभिनंदन सिध्दी”, असं म्हणत त्यांनी लेकीच्या कौतुकास्पद ही खास पोस्ट शेअर केली.
गेली काही वर्षे शरद पोंक्षे यांच्या कुटुंबियांना अवघडच गेली होती. कारण शरद यांना कर्करोगाचं निदान झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी अतिशय खंबीरपणे त्यांना साथ दिली. अशा परिस्थितीत अभ्यास करुन त्यांच्या मुलीने बारावीच्या परिक्षेतही चांगले गुण मिळवले होते. त्यानंतर त्यांची लेक उच्च शिक्षणासाठी परदेशात गेली आणि ती आता पायलट झाली आहे.