Sandesh Jadhav Interview : चित्रपट असो वा मालिका पोलीस इन्स्पेक्टर म्हटलं की एक नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे संदेश जाधव. बरेचदा एकाच धाटणीच्या भूमिका सतत केल्याने तो कलाकार त्या साच्यात अडकला जातो आणि प्रेक्षकांच्या नजरेतही तो साचेबद्ध होऊन जातो. असंच काहीस झालंय ते म्हणजे अभिनेते संदेश जाधव यांचं. अनेक नाटक, चित्रपट यांमध्ये मत्त्वपूर्ण भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. रंगमंचावर त्यांनी विशेष भर दिला. तर केवळ मराठी नव्हे तर हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली. मात्र आजही संदेश जाधव यांना हवी तशी प्रसिद्धी मिळालेली नाही. यामागचं नेमकं कारण काय आहे याबद्दल स्वतः संदेश जाधव यांनी भाष्य केलं आहे.
संदेश जाधव यांनी ‘इट्स मज्जा’च्या ‘ठाकूर विचारणार’ या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या करिअरबाबत अनेक खुलासे केले. त्यावेळी हवी तशी प्रसिद्धी, लोकप्रियता मिळाली नाही याबाबत प्रश्न विचारताच संदेश जाधव म्हणाले, “खरं सांगायचं तर बृहन्मुंबई महानगर पालिकेत मी अजूनही कामाला आहे. नोकरी सांभाळत करिअरही सुरु आहे. माझं बालपण हे मुंबईतील एका बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या वस्तीत गेलं आहे. त्यामुळे तिथे राहत असताना अगदी लहानपणापासून मला अभिनयाची आवड निर्माण झाली. चाळीत राहत असल्याने तिथे अनेक कार्यक्रम व्हायचे आणि त्यात सहभाग घेण्यापासून ही आवड अधिक दृढ होत गेली”.
पुढे ते म्हणाले, “त्यानंतर कॉलेजमध्ये असताना एकांकिका, नाटक यांत जाणं व्हायचं. आणि कॉलेजनंतर मी बृहन्मुंबई महानगर पालिकेत कामाला लागलो. तिथे असतानाही नाटकात जात होतो. इतकंच नाही तर कामावरही नाटकांच्या स्पर्धा व्हायच्या त्यातही जायची त्यामुळे माझं नाव झालं. हळूहळू मी नाटक करायला लागलो. त्यानंतर मी एक चित्रपट केला डोंबिवली फास्ट. या चित्रपटामुळे माझं महाराष्ट्रात बरंच नाव झालं. बऱ्याच लोकांनी त्यानंतर मला सल्ला दिला की तू याकडे लक्ष दे. पण नोकरीमुळे मला अभिनयाकडे तितकासा वेळ देणं जमलंच नाही”.
ते असंही म्हणाले की, “माझं काम घेऊन एखाद्याकडे जाणं हे मी कधीच केलं नाही. त्याच्यामुळे माझी ओळख लोकांना झाली नसावी. मला माझं मार्केटिंग करणं तितकंसं जमलं नाही. सोशल मीडियावरही मी तितकासा सक्रिय नाही आहे, जे काही माझं सोशल मीडिया आहे ते माझी मुलगी पाहते. या सगळ्यात मी फार ऍक्टिव्ह नसल्याने मी मागे आहे. संदेश जाधव हे नाव लोकांना माहित आहे पण मी खूप काही फेमस नाही. केवळ इन्स्पेक्टरच्या भूमिकांमुळे माझी ओळख आहे असं नाही तर एका चित्रपटात मी तृतीयपंथीचा अभिनय केला होता ही भूमिका सुद्धा एक वेगळी ओळख आहे”.