Shilpa Navalkar On Writers : मराठी कलाविश्वात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. मराठी मालिकाविश्वाची परिस्थिती आता काहीशी डगमगताना दिसत आहे. बऱ्याच मराठी मालिका या सुरु होताच संपताना दिसत आहेत. त्या केव्हा सुरु झाल्या आणि केव्हा बंद झाल्या हे बरेचदा कळतही नाही. आणि या सगळ्याला बरेचदा प्रॉडक्शन टीम जबाबदार असते. इतकंच नाही तर एखाद्या मालिकेची टीमही या सगळ्याला जबाबदार असते. आणि यामुळे हिंदी मालिकांची आज जी अवस्था झाली आहे त्याकडे आता मराठी मालिकाही वळताना दिसत आहेत. आणि या मराठी मालिकांच्याही दुरावस्थेबाबत आता मराठमोळ्या लेखिका शिल्पा नवलकर यांनी भाष्य केलं आहे. शिल्पा यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या सगळ्याला लेखकही तितकेच जबाबदार आहेत असं म्हटलं आहे.
शिल्पा यांनी ‘मज्जाचा अड्डा’ या मुलाखतीत बोलताना लेखकांच्या कामाबाबत भाष्य केलं आहे. एकाच लेखकाचं नाव अनेक मालिकांना लावलं जातं आणि त्यामुळेच सगळं गणित बिघडत असं काहीस त्यांनी या मुलाखतीदरम्यान म्हटलं आहे. अभिनेत्री, लेखक शिल्पा म्हणाल्या, “मराठीमध्ये घोस्ट रायटिंग होत नाही हे विधान आता खरं उरलेलं नाही. काही वर्षांपूर्वी हे व्हायचं की, जो लेखक होता तोच मालिकेचं लिखाण करायचा. काहीवेळा त्यांचे असिस्टंट असिस्ट करतील इतकं काम करायचे. पण आता हे चित्र बदललं आहे, आता मी एका लेखकाची नावं चार मालिकांना लागलेली पाहते. त्यातील एखादी ते लिहीत असतील, एखादी त्यांचा असिस्टंट लिहीत असेल आणि बाकीच्या दोन मालिका वेगळंच कुणीतरी लिहतं आणि नाव त्यांचं दिलं जातं”.
आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री झाली आई, घरी चिमुकलीचं आगमन, पहिला फोटो केला शेअर
पुढे त्या म्हणाल्या, “अनेकदा मला असं वाटत की, तो लेखक दुसऱ्या कुणीतरी लिहिलेल्या लिखाणावर नजर तरी टाकत असेल का?. जर मी लिहिणार असेल, माझं नाव लागतंय तर जे शब्द लेखकाचे आहेत ते बोलले जावेत. बरेचदा कलाकार संवाद बदलतात. दुसरं कुणीतरी लिहून देणं, त्यावर मी केवळ नजर फिरवणं हे मला पटत नाही. आज हिंदी मालिकांची जी वाट लागली आहे त्याजागी आता हळूहळू मराठी मालिकाही जाऊ शकतात. आणि याच कारण हेच आहे की, आज आपल्याकडे तंत्रज्ञान खूप कमी आहे. आज जेव्हा मराठी मालिका करायची आहे तेव्हा तो टीम गोळा करायला लागतो, तेव्हा कॉस्च्युम डिझाइनर, पटकथा लेखक, संवाद लेखक, कॅमेरामन, आर्ट डिरेक्टर असेल या सगळ्यासाठी नेहमीची तीच पाच नावे त्याच्यासमोर येतात. आणि मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की, पटकथा लेखक आणि संवाद लेखक म्हणून प्रत्येकवेळी शिल्पा नवलकर हे नाव पहिल्या पाचमध्ये असतील”.
शिल्पा पुढे असंही म्हणाल्या की, “आज मी ठरवलं तर माझं सहा मालिकांना नाव लागू शकेल, पण मी त्या सहा मालिका एकाच वेळी लिहू शकेल का?. माणूस म्हणून वैयक्तिकरित्या मी दोनसुद्धा नाही लिहू शकत. दुसऱ्यासाठी मग मला असिस्टंट हा ठेवावाच लागेल. मग अशावेळेला त्या सहा प्रोजेक्टच जे व्हायचं तेच होणार. माझ्याकडून योग्य वेळी काम गेलं नाही तर सेटवर सगळ्यांचीच तारांबळ होणार. आज हिंदी मालिकांची जी अवस्था आहे ती इथूनच सुरु झाली होती. आणि मला इतकंच वाटत जे काम मी केलं आहे, मी करतेय तिथेच माझं नाव लावलं जावं”.