‘आ’ म्हणजे आत्मीयता आणि ‘जी’ म्हणजे जीवन. आत्मीयतेने जगायला शिकवणारी समृद्धीचे जीवन म्हणजे आजी. आजी आणि नातवाचं नातं कायमच खास असतं. आजीपण हे लांबविलेले आईपण असते. आजी आपल्या नातवंडाबरोबर प्रत्येक दिवस “अजि सोनियाचा दिनु” म्हणून घालवू पाहात असते. आजीच्या प्रेमाला दुधाच्या सायीची उपमा दिली जाते हे खरे, पण आजी फक्त साय जपणे हेच काम करत असते. त्यामुळे प्रत्येक नातवाच्या आयुष्यात आजी ही खास असते.
अशीच आजीची एक खास आठवण अभिनेता संदीप पाठकने शेअर केली आहे. प्रेक्षकांना खळखळून हसवणारा सर्वांचा लाडका अभिनेता संदीप पाठक सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. संदीप सोशल मीडियावरील अनेक ट्रेंड फॉलो करत असतो. रिल्स व्हिडीओ शेअर करत असतो. अशातच त्याने नुकताच त्याच्या आजीचा एक व्हिडीओ शेयर केला आहे.
संदीप काही कामानिमित्त उदगीरला गेला असताना त्याने आजीची म्हणजेच आईच्या आईची भेट घेतली. यावेळी त्याने आपल्या आजीबरोबर मनमुराद संवाद साधला. या व्हिडीओमध्ये संदीपची आजी त्याला इथे कसा आला म्हणून विचारते, तेव्हा संदीप मी तुला खास भेटायला आलो” असल्याचे म्हणतो.
तसेच या व्हिडीओमध्ये तो माझ्या आजीचे वय आता १०१ असल्याचेदेखील सांगतो. हा खास व्हिडीओ शेअर करत त्याने असा म्हटलं आहे की, “आमची माई (आईची आई) वय वर्षे १०१. उदगीरला माईला भेटायला गेलो. मी आलो हे बघून तिला खुप आनंद झाला. अजूनही माझ्या आजीचा आवाज खणखणीत, दात शाबूत, स्मरणशक्तीही तशी आहे. जुनं ते सोनं.”
दरम्यान, हा व्हिडीओ शेअर करताच अनेकांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अभिनेता जितेंद्र जोशीने “नशीबवान आहेस तू” असं म्हणत कमेंट केली आहे. तर अनेक चाहत्यांनी “खूप गोड, खूप छान, आजीला आणखी दीर्घायुष्य लाभो” अशा अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.