सध्या बॉक्स ऑफिसवर एकाची चित्रपटाची चर्चा आहे तो चित्रपट म्हणजे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’. बऱ्याच दिवसांपासून वीर सावरकर यांची महती सांगणाऱ्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु होती. अखेर २२ मार्च रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. दरम्यान चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. अनेकांना स्वातंत्र्यवीर सावरकरांची देशभक्ती, त्यांचं राजकीय व सामाजिक कार्य मोठ्या पडद्यावर पाहायला आवडलं आहे. चित्रपटाबाबतची पोस्ट चाहत्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर करत चित्रपटाचं भरभरुन कौतुक केलं आहे. (Prasad Oak On Swatantra veer Savarkar Movie)
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात अभिनेता रणदीप हुड्डा वीर सावरकरांच्या भूमिकेत पहायला मिळत आहे. तर अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने सावरकरांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट हिंदीच नव्हेतर आता मराठी भाषेतही प्रदर्शित झाला आहे. सुबोध भावे या अभिनेत्याने रणदीप हुड्डाने साकारलेल्या वीर सावरकरांच्या भूमिकेला आवाज दिला आहे. नुकताच मराठी भाषेतील चित्रपटाचा प्रीमिअर पार पडला. यावेळी चित्रपटातील मुख्य कलाकारांसह मराठी सिनेइंडस्ट्रीमधील अनेक कलाकार उपस्थित होते.
चित्रपटाच्या या खास प्रीमिअरवेळी अंकिता लोखंडे व रणदीप हुड्डा यांच्यासह अमृता खानविलकर, प्रसाद ओक त्याची पत्नी मंजिरी ही कलाकार मंडळी हजर होती. चित्रपट पाहिल्यावर अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओकने खास पोस्ट शेअर केली आहे. प्रसादने शेअर केलेल्या या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रसाद म्हणाला, “‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ अप्रतिम चित्रपट! अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विचारपूर्वक केलेली मांडणी, अतिशय संयत अभिनय, उत्तम पटकथा, देखणं छायाचित्रण, परिणामकारी पार्श्वसंगीत. रणदीप हुड्डा व अंकिता लोखंडे आणि संपूर्ण टीमचं मनःपूर्वक अभिनंदन!”.
पुढे त्याने असंही म्हटलं आहे की, “चित्रपट आता मराठीत सुद्धा प्रदर्शित झाला आहे. आमचे मित्र सुबोध भावे यांनी वीर सावरकरांना आवाज दिलेला आहे. कोणत्याही खोट्या पोस्टकडे लक्ष देऊ नका. चित्रपट उत्तम प्रतिसादात चालू आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा सावरकरांना त्रिवार वंदन जय हिंद!”, अशी पोस्ट प्रसाद ओकने शेअर केली आहे.